What Is Option Trading: उत्तर प्रदेशातील पिलीभीत जिल्ह्यातील एका तरुणानं शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करून ५५ लाख रुपये गमावले. मध्यमवर्गीय कुटुंबातील या तरुणानं छोट्या गुंतवणुकीतून सुरुवात केली. तो लोभाच्या जाळ्यात इतका अडकला की त्यानं ट्रेडिंगसाठी बँक आणि नातेवाईकांकडून ४५ लाख रुपयांचं कर्जही घेतलं. काही महिन्यांतच त्यानं एकूण ५५ लाख रुपये गमावले.
आता त्या विवाहित तरुणाचं संपूर्ण कुटुंब गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. परिस्थिती अशी आहे की मुलांचं शिक्षणही सुटलंय आणि घरात अन्नधान्याचीही कमतरता आहे. आता त्या तरुणानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे नेमके काय आहे ते आपण जाणून घेऊया, ज्यामध्ये अडकून त्या तरुणानं आपल्या संपूर्ण कुटुंबाला अडचणीत ढकललंय.
ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?
ऑप्शन ट्रेडिंग हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा एक खास मार्ग आहे. यामध्ये, तुम्ही थेट शेअर्स खरेदी करत नाही, परंतु भविष्यात निश्चित किंमतीला शेअर्स खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो. या अधिकाराच्या बदल्यात तुम्हाला काही पैसे द्यावे लागतात, याला प्रीमियम म्हणतात. ऑप्शन्सचे दोन प्रकार आहेत: कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन.
कॉल ऑप्शन म्हणजे काय?
कॉल ऑप्शन हे तुम्हाला एका निश्चित कालावधीत निश्चित किंमतीला शेअर्स खरेदी करण्याचा अधिकार देते. समजा आज एका शेअरची किंमत १०० रुपये आहे. तुम्ही हा शेअर एका महिन्यासाठी १०० रुपयांना खरेदी करू शकता असा कॉल ऑप्शन घेतला. जर एका महिन्यानंतर त्या शेअरची किंमत १५० रुपये झाली, तर तुम्ही तो १०० रुपयांना खरेदी करून नफा कमवू शकता.
पुट ऑप्शन म्हणजे काय?
पुट ऑप्शन हे तुम्हाला एका निश्चित कालावधीत निश्चित किंमतीला शेअर्स विकण्याचा अधिकार देते. समजा तुम्ही एक पुट ऑप्शन घेतला आहे ज्यामध्ये तुम्ही शेअर्स १०० रुपयांना विकू शकता. जरी नंतर किंमत ६० रुपयांपर्यंत घसरली तरी तुम्ही ते १०० रुपयांना विकून नफा कमवू शकता.
नुकसान कसं होऊ शकतं?
जेव्हा बाजारभाव तुमच्या अंदाजानुसार बदलत नाही तेव्हा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तोटा होऊ शकतो आणि हे अनेकदा घडतं. जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन खरेदी करता तेव्हा तुम्हाला प्रीमियम भरावा लागतो. जर तुमच्या अपेक्षेनुसार शेअरची किंमत वाढली नाही किंवा घसरली नाही, तर तुम्ही एक्सपायरी डेटपर्यंत ऑप्शनचा वापर करणार नाही. या परिस्थितीत, तुम्ही भरलेले संपूर्ण प्रीमियम पैसे बुडतात. जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन विकता तेव्हा तुम्हाला प्रीमियम मिळतो, परंतु तुम्हाला दुसऱ्याला निश्चित किमतीत शेअर्स खरेदी करण्याचे किंवा विकण्याचं सांगावं लागतं. जर बाजारभाव विरुद्ध दिशेनं खूप जास्त गेला तर तुम्हाला अमर्याद नुकसान होऊ शकतं.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)