lokmat Supervote 2024
Lokmat Money >शेअर बाजार > आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

महत्वाच्या आयटी कंपन्यांचे वार्षिक निकाल पुढील सप्ताहामध्ये जाहीर होणार असून या कंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By प्रसाद गो.जोशी | Published: April 15, 2024 10:17 AM2024-04-15T10:17:12+5:302024-04-15T10:17:48+5:30

महत्वाच्या आयटी कंपन्यांचे वार्षिक निकाल पुढील सप्ताहामध्ये जाहीर होणार असून या कंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Shares of IT companies will do the good Will these companies benefit shareholders | आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

आयटी कंपन्यांचे शेअर्स करणार मालामाल? या कंपन्या भागधारकांना श्रीमंत करणार का?

प्रसाद गो. जोशी
 

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टीसीएसने अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी केल्याने या समभागाला चांगली मागणी राहू शकते. अन्य महत्वाच्या आयटी कंपन्यांचे वार्षिक निकाल पुढील सप्ताहामध्ये जाहीर होणार असून या कंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

गतसप्ताहातमध्ये बाजाराला विक्रीचा मोठा फटका बसला. सप्ताहाचा प्रारंभ चांगल्या वाढीने झाला परंतु नंतर इराणकडून इस्त्रायलवर झालेला क्षेपणास्त्र हल्ला आणि फेडरल रिझर्व्हकडून दरामध्ये लगेच कपात होण्याची शक्यता दिसत नसल्याने गुंतवणूकदारांनी विक्री करून नफा कमविण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे बाजारात मोठी घसरण होऊन आधी झालेला नफा वाहून गेला.
 

  • आगामी सप्ताहात ६३ कंपन्या आपले वार्षिक निकाल जाहीर करणार असून त्यामध्ये इन्फोसिस, विप्रो अशा आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. गतसप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेले टीसीएसचे निकाल हे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. 
  • तोच कित्ता अन्य आयटी कंपन्यांनी गिरविल्यास त्यांचे समभागही घोडदौड करण्याची शक्यता असल्याने आयटीकंपन्या आपल्या भागधारकांना मालामाल करण्याची शक्यता आहे. आगामी सप्ताहातही बुधवारी बाजाराला रामनवमीची सुटी असणार आहे. त्यामुळे कमी दिवस व्यवहार होणार आहेत.



परकीय वित्तसंस्थांची खरेदी
 

भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर चांगला राहण्याची शक्यता असून अर्थव्यवस्था मजबूत बनल्याचा अर्थतज्ज्ञांचा निर्वाळा दिल्याने परकीय वित्तसंस्थांनी भारतात खरेदी वाढविली. एप्रिलमध्ये आतापर्यंत या संस्थांनी समभागांमध्ये १३,३०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. याशिवाय रोख्यांमध्येही १५२२ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारतीय वित्तसंस्थांकडूनही मोठ्या प्रमाणात खरेदीची अपेक्षा आहे.
 

यामुळे ठरेल पुढील दिशा
 

आंतरराष्ट्रीय पातळीवरही आगामी सप्ताहात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत. त्यामध्ये पहिल्या तिमाहीचा चीनचा जीडीपी, अमेरिकेच्या रिटेल सेलची आकडेवारी, बेरोजगारीची स्थिती तसेच युरोप, इंग्लंड, जपानची चलनवाढीची स्थितीही जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे भारतातील चलनवाढीची आकडेवारीही जाहीर होणार आहे. या सर्वच घटकांचा बाजारावर काय परिणाम होतो, ते बघणेही महत्वाचे आहे.

Web Title: Shares of IT companies will do the good Will these companies benefit shareholders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.