Market Crash : जगातील प्रसिद्ध 'रिच डॅड पूअर डॅड'चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा मोठी भविष्यवाणी केली आहे. मंदी आणि मार्केट क्रॅशवर आपले मत मांडण्यासाठी कियोसाकी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी नुकत्याच केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये जागतिक बाजारासाठी गंभीर इशारा दिला आहे. कियोसाकी यांच्या मते, जगावर इतिहासातील सर्वात मोठे मार्केट क्रॅश येणार आहे आणि हे संकट केवळ अमेरिका किंवा युरोपपुरते मर्यादित राहणार नाही, तर आशिया खंडातही त्याची तीव्र झळ पोहोचेल.
AI मुळे नोकऱ्या आणि रिअल इस्टेट कोसळणार
कियोसाकी यांनी आपल्या पोस्टमध्ये या संकटाचे कारण स्पष्ट करताना लिहिले आहे, की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे लवकरच मोठ्या प्रमाणावर लोकांच्या नोकऱ्या संपुष्टात येतील. नोकऱ्यांमध्ये घट झाल्यामुळे ऑफिस आणि निवासी रिअल इस्टेट सेक्टरदेखील मंदीच्या कचाट्यात सापडून कोसळेल. कियोसाकी म्हणाले की, २०१३ मध्ये त्यांनी 'रिच डॅड्स प्रोफेसी' हे पुस्तक प्रकाशित केले होते, ज्यात त्यांनी इतिहासातील सर्वात मोठ्या घसरणीची भविष्यवाणी केली होती, आणि दुर्दैवाने ती घसरण आता सुरू झाली आहे.
'या' ॲसेट क्लासेसमध्ये गुंतवणूक करा
कियोसाकी यांनी मंदीच्या भीती दरम्यान गुंतवणूकदारांना काय खरेदी करावे, याबद्दल स्पष्ट मत मांडले आहे. त्यांनी सोन्याला, चांदीला आणि प्रमुख क्रिप्टोकरन्सीजला 'भविष्यातील सुरक्षित गुंतवणूक' मानले आहे.
कियोसाकी यांचा सल्ला काय?
कियोसाकी यांच्या मते, चांदी हा सध्याचा सर्वात सुरक्षित आणि सर्वोत्तम गुंतवणूक पर्याय आहे, जो भविष्यात नवीन उच्चांक गाठू शकतो. सध्या चांदीचा भाव सुमारे ५० डॉलर आहे. कियोसाकी यांच्या अंदाजानुसार, चांदी लवकरच ७० डॉलरच्या पातळीवर येऊ शकते. २०२६ पर्यंत तिचा भाव २०० डॉलर र्यंत पोहोचू शकतो.
मंदी तुम्हाला श्रीमंत करेल!
कियोसाकी यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्यांसाठी एक संदेश दिला: "चांगली बातमी ही आहे की लाखो लोक आपले सर्व काही गमावतील, पण तुम्ही तयार असाल, तर ही घसरण तुम्हाला अधिक श्रीमंत बनवेल." भविष्यात बाजारात मोठी घसरण झाली तरी, तयारी केलेल्या गुंतवणूकदारांसाठी श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग उपलब्ध असतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
वाचा - शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
