Reliance Power News: अनिल अंबानी यांच्या नेतृ्तवातील रिलायन्स ग्रुपला एकामागून एक धक्के बसत आहेत. सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी समूहातील रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये तब्बल १०.५% पर्यंत घसरण नोंदवली गेली, ज्यामुळे कंपनीचा शेअर किंमत ₹४३ च्या आसपास ट्रेड होताना दिसला. तसेच, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरमध्येही ४.५% घट झाली.
कंपनीचे वरिष्ठ कार्यकारी अशोक कुमार पाल यांना शनिवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बनावट बँक हमी प्रकरणात अटक केली होती. प्राथमिक चौकशीनंतर त्यांना दोन दिवसांच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. ईडीच्या आरोपानुसार त्यांनी सुमारे ₹६८.२ कोटींच्या संशयास्पद बँक गॅरंटी घोटाळ्यात प्रमुख भूमिका बजावली आहे. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. आठवड्याच्या पहिल्या ट्रेडिंग सत्रात कंपनीचे शेअर्स घसरले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला.
ईडीची कारवाई
अहवालांनुसार, २४ जुलै रोजी अंमलबजावणी संचालनालयाने रिलायन्स ग्रुपमधील आर्थिक अनियमिततेची चौकशी सुरू केली होती. ईडीने अनिल अंबानी समूहाशी संबंधित ३५ ठिकाणे, ५० कंपन्या आणि २५ हून अधिक व्यक्तींची चौकशी केली आहे. २०१७ ते २०१९ दरम्यान येस बँकेकडून घेतलेल्या ३,००० कोटी रुपयांच्या कर्जाचा गैरवापर झाल्याचा संशय अंमलबजावणी संचालनालयाला आहे.
(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)