SpiceJet Airways : आर्थिक अडचणीतून मार्ग काढणाऱ्या स्पाइसजेट या विमान कंपनीला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने केएएल एअरवेज (KAL Airways) आणि प्रसिद्ध उद्योगपती कलानिधी मारन (Kalanithi Maran) यांनी स्पाइसजेटकडून मागितलेली १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान भरपाईची मागणी फेटाळून लावली आहे. या निर्णयामुळे स्पाइसजेटच्या गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सोमवारी (२६ मे) कंपनीच्या शेअर्समध्येही लक्षणीय वाढ दिसून आली.
१० वर्षांहून जुना कायदेशीर लढा संपला?
स्पाइसजेटने सोमवारी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, हा महत्त्वाचा निर्णय २३ मे २०२५ रोजी आला. हे प्रकरण १० वर्षांहून अधिक जुने असून, मारन आणि स्पाइसजेट यांच्यातील हा कायदेशीर लढा अनेक वर्षांपासून सुरू होता. स्पाइसजेटने स्पष्ट केले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांनी मारन यांचे हे दावे पूर्णपणे तपासले होते आणि ते फेटाळले होते. त्यानंतर मारन आणि केएएल एअरलाइन्सने पुन्हा दिल्ली उच्च न्यायालयाच्या एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे तीच नुकसान भरपाई मागितली, परंतु न्यायालयाने ती मागणीही फेटाळली.
काय आहे हे प्रकरण?
या कायदेशीर लढ्याची सुरुवात २०१० मध्ये झाली होती, जेव्हा कलानिधी मारन आणि केएएल एअरवेजने स्पाइसजेटमध्ये मोठा (५८.४६%) हिस्सा खरेदी केला होता. मात्र, फेब्रुवारी २०१५ मध्ये, त्यांनी एका पुनरुज्जीवन करारांतर्गत हा संपूर्ण हिस्सा स्पाइसजेटचे मूळ संस्थापक अजय सिंग (Ajay Singh) यांना हस्तांतरित केला. मारन यांचा दावा होता की, त्यांनी वॉरंट आणि प्रेफरन्स शेअर्ससाठी ६७९ कोटी रुपये दिले होते, पण ते शेअर्स कधीही जारी केले गेले नाहीत. येथूनच हा कायदेशीर संघर्ष सुरू झाला.
यापूर्वी, लवाद न्यायाधिकरणाने मारनच्या बाजूने निकाल दिला होता आणि स्पाइसजेटला व्याजासह ५७९ कोटी रुपये परत करण्यास सांगितले होते. पण, २०२४ मध्ये दिल्ली उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्द केला आणि प्रकरणाची पुन्हा तपासणी करण्यास सांगितले. यानंतर, मारन यांनी स्पाइसजेटकडून १,३२३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई मागितली होती, जी स्पाइसजेटने 'मूर्खपणाची' म्हणून नाकारली होती आणि आता ती मागणी उच्च न्यायालयानेही फेटाळली आहे.
वाचा - SIP की Lumpsum? बाजारातील चढ-उतारात कशी कराल गुंतवणूक, तज्ज्ञांचा सल्ला वाचा!
स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये वाढ
दिल्ली उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर स्पाइसजेटच्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळी मोठी तेजी दिसून आली. सकाळी ११:०५ वाजता बीएसईवर (BSE) कंपनीचा शेअर २.६२% वाढून ४४.९८ रुपये प्रति शेअर झाला होता. याच वेळी, कंपनीचे मार्केट कॅप (Market Capitalization) ५,७६६.३८ कोटी रुपये होते. या सकारात्मक निर्णय़ामुळे कंपनीला भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.