India-Russia Relation: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन 4 डिसेंबर रोजी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत 23व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होतील. या बैठकीचे मुख्य केंद्रबिंदू व्यापार, संरक्षण आणि सामरिक सहकार्य असेल. विशेषतः गुंतवणूकदारांची नजर भारतीय संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांवर असेल, कारण या परिषदेत होणारे संभाव्य करार त्यांच्या शेअर्सवर थेट परिणाम करू शकतात.
भारत-रशिया संरक्षण सहकार्य
भारत आणि रशियाचे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य दशकांपासून मजबूत राहिले आहे. पुतिन यांच्या दौऱ्यात प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली, फायटर जेट्स, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि संयुक्त उत्पादन यांसारख्या मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.
यामुळेच HAL, BDL, BEL यांसारख्या संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांना मोठ्या ऑर्डर्स आणि तंत्रज्ञानातील नवीन संधी मिळू शकतात. कोणताही नवीन करार किंवा घोषणा झाल्यास या कंपन्यांच्या मार्केट व्हॅल्यूत तात्काळ हालचाल दिसू शकते.
संभाव्य संरक्षण करार
मार्केट विश्लेषकांच्या अंदाजानुसार, या परिषदेत भारत-रशिया दरम्यान काही मोठे करार होऊ शकतात. त्यात प्रमुखतः:
S-400 एअर डिफेन्स सिस्टमच्या अतिरिक्त युनिट्स
S-500 प्रगत एअर डिफेन्स सिस्टम
5व्या पिढीचे सुखोई-57 फायटर जेट्स
मिसाइल तंत्रज्ञान हस्तांतरण
संयुक्त उत्पादन प्रकल्प (Joint Production Projects)
या करारांमुळे HAL आणि BDL यांच्या ऑर्डर बुकला अनेक वर्षांसाठी बळकटी मिळू शकते. तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून भारतातील स्वदेशी उत्पादन क्षमता आणखी वाढण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांचा भारत दौरा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी त्याचा आर्थिक आणि शेअर बाजारावरही मोठा प्रभाव आहे.
(टीप- शेअर बाजारात कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक तज्ञाचा सल्ला घ्या.)
