EPFO: करिअरमध्ये चढ-उतार येणे सामान्य आहे. नोकरी जाणे, कंपनी बंद होणे किंवा ब्रेक घेणे...यामुळे नियमित पगार थांबतो आणि आर्थिक सुरक्षिततेची चिंताही वाढते. अशा वेळी अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, प्रॉविडंट फंड (PF) मध्ये जमा झालेल्या रकमेचे काय होईल? नोकरी गेल्यानंतर त्यावर व्याज मिळणे थांबेल का? या प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
नोकरी गेल्यावरही PF वर व्याज सुरूच राहते
Employees’ Provident Fund Organisation (EPFO) च्या नियमानुसार, नोकरी असो वा नसो, PF खात्यावर व्याज मिळणे थांबत नाही. नवीन योगदान बंद झाले तरी जमा रकमेवर व्याज मिळत राहते. तांत्रिकदृष्ट्या, योगदान थांबल्यानंतर खाते ३६ महिन्यांपर्यंत सक्रिय राहते. त्यानंतर ते ‘निष्क्रिय’ झाले तरीही व्याजाची गणना सुरूच राहते.
कंपाउंडिंगमुळे वाढते बचत
PF हे केवळ बचत खाते नसून, दीर्घकालीन गुंतवणुकीचे मजबूत साधन आहे. या खात्यावरील आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी व्याजदर सुमारे ८.२५% आहे. कंपाउंडिंगमुळे मूळ रक्कम + व्याजावरही व्याज मिळते. विशेष म्हणजे, वयाच्या ५८ वर्षांपर्यंत व्याज सुरू राहते. उदाहरणार्थ, जर खात्यात ५ लाख रुपये असतील आणि पुढे योगदान केले नाही, तरी दीर्घकाळात ही रक्कम लक्षणीयरित्या वाढू शकते. वयाच्या ५८ वर्षांनंतर PF वर व्याज मिळणे बंद होते. अशावेळी संपूर्ण रक्कम काढून इतर गुंतवणुकीत वळवणे योग्य ठरते.
पैसे काढताना घाई करू नका
नोकरी नसताना आर्थिक अडचण येणे स्वाभाविक आहे. EPFO कडून काही प्रमाणात पैसे काढण्याची सुविधा आहे. एकूण रकमेपैकी ७५% रक्कम काढता येते, तर उर्वरित २५% रक्कम १ वर्षानंतर काढता येते. मात्र, तज्ज्ञांच्या मते दैनंदिन खर्चासाठी PF वापरणे टाळावे. मोठी रक्कम काढल्यास कंपाउंडिंगचा फायदा कमी होतो.
घरबसल्या तपासा PF बॅलन्स
आजच्या डिजिटल युगात PF ची माहिती सहज उपलब्ध आहे. UMANG अॅप आणि EPFO ची अधिकृत वेबसाइटवरून तुम्ही पासबुक, व्याज आणि बॅलन्स तपासू शकता.
