Who is Raju Mantena: अनंत अंबानी यांच्या भव्य विवाहसोहळ्यानंतर भारतात आणखी एक आलिशान लग्नसोहळा होत आहे. अमेरिकेतील फार्मा क्षेत्रातील मोठे नाव असलेल्या राजू मंटेना यांच्या मुलीचा विवाह उदयपूरमध्ये होत आहे. हा केवळ कौटुंबिक सोहळा नसून, आंतरराष्ट्रीय इव्हेंट बनला आहे. या लग्नासाठी हॉलिवूड, बॉलिवूड आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावणार आहेत. यामुळेच हा विवाहसोहळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
राजस्थानमधील उदयपूर शहरात अमेरिकन अब्जाधीश राजू मंटेना यांची मुलगी नेत्रा मंटेना आणि वामसी गदिराजू यांचा शाही विवाहसोहळा होत आहे. या सोहळ्यासाठी डोनाल्ड ट्रंप ज्युनियर, जेनिफर लोपेझ, जस्टिन बीबर यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार येणार आहेत. उदयपूरमधील सिटी पॅलेस आणि जगमंदिर आयलंड पॅलेस येथे हा भव्य सोहळा होत आहे.
राजू मंटेना कोण आहेत?
अनेकांना उत्सुकता वाटणारा प्रश्न म्हणजे राजू मंटेना नक्की कोण? राजू मंटेना हे भारतीय वंशाचे अमेरिकन फार्मा उद्योजक आहेत. त्यांनी JNTU मधून संगणक शास्त्राची पदवी घेतल्यानंतर अमेरिकेत फार्मास्युटिकल क्षेत्रात पाऊल टाकले. ते सध्या ‘Ingenus Pharmaceuticals’ चे चेअरमन आणि सीईओ आहेत. ही कंपनी अमेरिकेत स्वस्त आणि सुलभ औषधे उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
याशिवाय ते फ्लोरिडास्थित ‘Integra Connect’ चे संस्थापक असून, अमेरिकन आरोग्य व्यवस्थेचे डिजिटल परिवर्तन घडवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. भारतीय मुळांशी घट्ट नाते जपणारे मंटेना यांनी मुलीच्या विवाहासाठी उदयपूरची निवड केली आहे.
दान-धर्मातही पुढे...
राजू मंटेना आपल्या त्यांच्या खर्चासाठी आणि परोपकारी कार्यांसाठीही ओळखले जातात. 2023 मध्ये त्यांनी फ्लोरिडातील सुमारे 400 कोटी रुपयांचे आलिशान इस्टेट खरेदी केले. या आलिशान बंगल्यात 16 बेडरुम्स, प्रायव्हेट बीच आणि घोड्यांच्या तबेल्याची सोय आहे. तर, 2017 मध्ये त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरात 28 किलो सोन्याची ‘माळ’ दान केली होती, ज्याची किंमत तेव्हा 8.36 कोटी रुपये होती.
