Tesla's New Strategy : अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्लाने काही दिवसांपूर्वीच भारतात आपले शोरूम उघडले असले तरी, येथील जास्त किमतीमुळे टेस्लाच्या गाड्यांचा खप पाहिजे तसा वाढत नाहीये. हीच बाब लक्षात घेऊन आणि जागतिक इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील तीव्र स्पर्धेला तोंड देण्यासाठी, टेस्लाने आता Model Y आणि Model 3 चे स्टँडर्ड व्हेरियंट कमी किमतीत जागतिक स्तरावर लाँच केले आहेत. या नव्या आणि परवडणाऱ्या मॉडेल्समुळे टेस्लाला आपली बाजारपेठेतील हिस्सेदारी पुन्हा मिळवण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
परवडणाऱ्या किमतीत नवीन २ मॉडेल बाजारात
जागतिक स्तरावर विक्रीत झालेल्या घसरणीनंतर टेस्लाने हे पाऊल उचलले आहे. स्वस्त गाड्या लाँच करून अधिक ग्राहक आकर्षित करण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
मॉडेलचे नाव | अमेरिकेतील किंमत (USD) | भारतीय रुपयांमध्ये अंदाजित किंमत (₹८८.७८ प्रति डॉलर) |
Model Y (स्टँडर्ड) | ३९,९९० | ३५,४९,११२ |
Model 3 (स्टँडर्ड) | ३६,९९० | ३२,८४,०४२ |
टीप: ही अमेरिकेतील किंमत आहे. भारतात आयात शुल्क आणि करांमुळे अंतिम 'ऑन-रोड' किंमत यामध्ये मोठी वाढ होणार आहे.
इतर प्रीमियम मॉडेल्सच्या किमती
टेस्लाने स्टँडर्ड व्हेरियंटसोबत इतर प्रीमियम मॉडेल्सच्या किमतीतही बदल जाहीर केले आहेत.
Model Y: प्रीमियम रियर-व्हील ड्राइव्हची किंमत ४४,९९० डॉलर तर टॉप-एंड परफॉर्मेंस ऑल व्हील ड्राइव्हची किंमत ५७,४९० डॉलर असेल.
Model 3: प्रीमियम रियर-व्हील ड्राइव्हची किंमत ४२,४९० डॉलर तर परफॉर्मेंस ऑल व्हील ड्राइव्हची किंमत ५४,९९० डॉलर निश्चित करण्यात आली आहे.
गुंतवणूकदारांचा प्रतिसाद थंड
कमी किमतीत नवीन मॉडेल्स लाँच केल्यामुळे विक्री वाढेल, अशी टेस्लाला आशा आहे. मात्र, या घोषणेनंतरही गुंतवणूकदारांनी टेस्लाचे शेअर्स विकले. मंगळवारी (७ ऑक्टोबर) बाजारात टेस्लाच्या समभागांमध्ये घसरण दिसून आली, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीतील घट आणि वाढती स्पर्धा हा चिंतेचा विषय बनला आहे.
वाचा - सोने-चांदीच्या किमतीचा फुगा फुटणार? भाव ₹१.२२ लाखांवरून थेट ₹७७,७०० पर्यंत कोसळणार? कोणी दिला इशारा
या स्वस्त मॉडेल्समुळे विदेशी ईव्ही उत्पादकांकडून होणाऱ्या स्पर्धेला टेस्ला कसे उत्तर देते आणि भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीच्या धोरणात काय बदल होतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.