सध्या सर्वत्रच एआयची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट आणि त्यानंतर टेस्लाचे प्रमुख इलॉन मस्क यांना ग्रीन कार्डबाबत विचारलेल्या प्रश्नानंतर अरविंद श्रीनिवास हे चर्चेत आले होते. अरविंद श्रीनिवास हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) आधारित सर्च इंजिन Perplexity AI चे सहसंस्थापक आणि सीईओ आहेत. पाहूया त्यांचा आजवरचा प्रवास कसा होता.
अरविंद श्रीनिवास यांचा जन्म १९९४ मध्ये चेन्नई येथे झाला आणि ते ३० वर्षांचे आहेत. अरविंद श्रीनिवास हे मद्रासच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे माजी विद्यार्थी आहेत. येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्रवेश घेतला. इथून त्यांनी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी - कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी मिळवली.
२०१९ साली त्यांनी रिसर्च सायंटिस्ट म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक वर्षे काम केल्यानंतर त्यांनी २०२२ मध्ये अमेरिकेत पर्प्लेक्सीटी एआय कंपनी सुरू केली. एआय कंपनी सुरू करण्यापूर्वी श्रीनिवास ओपनएआयमध्ये एआय रिसर्चर होते आणि त्यांनी गुगल आणि डीपमाइंडमध्येही इंटर्नशिप केली होती.
ग्रीन कार्डाच्या प्रतीक्षेत
सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणारे भारतीय वंशाचे रहिवासी अरविंद श्रीनिवास यांना अद्याप ग्रीन कार्ड मिळालेलं नाही. अशातच त्यांनी नुकतीच ग्रीन कार्डबाबत एक पोस्ट केली होती. "मला वाटतं मला ग्रीन कार्ड मिळायला हवं, तुम्हाला काय वाटतं?" असा प्रश्न त्यांनी केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना एलन मस्क यांनीही 'होय' असं म्हटलं होतं.
पंतप्रधानांचीही घेतली भेट
अरविंद श्रीनिवास यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर या भेटीचा फोटोही शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, पंतप्रधानांना भेटणे ही भाग्याची गोष्ट असल्याचं म्हटलं होतं. अरविंद श्रीनिवास यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनीही "तुम्हाला भेटून आणि एआयचा वापर आणि त्याच्या उत्क्रांतीबद्दल चर्चा करताना खूप छान वाटलं," असं म्हटलं होतं.
अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक
ओपनएआय, डीपमाइंड आणि गुगल सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करण्याव्यतिरिक्त, श्रीनिवास यांनी डीएएल-ई २ च्या विकासामध्ये देखील योगदान दिलंय. श्रीनिवास हे एंजल इनव्हेस्टर्सदेखील आहेत. त्यांनी इलेव्हनलॅब्स आणि सुनो सारख्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. सुंदर पिचाई यांचा त्यांच्या कामावर प्रभाव आहे. २०२५ च्या सुरुवातीला, श्रीनिवास आणि एआय बायटडान्ससह त्यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावामुळे चर्चेत आले. टिकटॉकचे अमेरिकेतील कामकाज ताब्यात घेण्यासाठी न्यूको नावाची नवीन अमेरिकेतील होल्डिंग कंपनी तयार करण्याची त्यांची योजना आहे.