SEBI Action on Avdhut Sathe: ट्रेडिंग गुरू अशी ओळख असलेल्या अवधूत साठे यांना तुम्हीही फोलो करत असाल तर तुमच्यासाठी धक्कादायक बातमी आहे. बाजार नियामक सेबीने मुंबईतील प्रसिद्ध फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर अवधूत साठे यांच्या विरोधात मोठे सर्च ऑपरेशन केले आहे. अवधूत साठे यांचे यूट्यूब चॅनेल सुमारे ९,३६,००० सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचले आहे. ते या माध्यमांतून मार्केट ॲनालिसिस, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणुकीच्या रणनीतींबद्दल माहिती देतात. सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश वार्ष्णेय यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात या कारवाईची माहिती दिली. त्यांनी थेट साठे यांचे नाव घेतले नसले तरी, त्यांच्या वक्तव्यामुळे या कारवाईकडे लक्ष वेधले गेले.
कोण आहेत अवधूत साठे?
अवधूत साठे हे एक प्रसिद्ध मार्केट इन्फ्लुएन्सर आणि ट्रेडिंग गुरू आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर बाजारात गुंतवणूक आणि ट्रेडिंगची माहिती देण्यावर त्यांचा भर असतो. सोशल मीडिया आणि कर्जत ट्रेडिंग अकादमीच्या माध्यमातून साठे यांनी स्वतःला एक तज्ज्ञ म्हणून नावारुपास आणलं आहे. लाखो लोक त्यांच्या ट्रेडिंग क्लासशी जोडले गेले आहेत.
मात्र, त्यांच्या काही क्लासेसबद्दल सेबीकडे तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींनुसार, ते ऑपरेटरसोबत मिळून पेनी स्टॉक्सचा प्रचार करून किरकोळ गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप आहे. यामुळे, सेबीने मुंबईजवळच्या कर्जत येथील त्यांच्या ट्रेडिंग अकादमीवर दोन दिवस शोधमोहीम राबवली. या कारवाईतून सेबी साठे आणि त्यांच्या अकादमीच्या कामकाजावर किती गंभीरपणे लक्ष ठेवून आहे, हे समोर आले आहे.
बाजार शिस्त हाच फोकस
कमलेश वार्ष्णेय यांनी सांगितले की, सेबी सामान्यतः वैयक्तिक प्रकरणांवर भाष्य करत नाही. मात्र, ही कारवाई बाजार शिस्त मजबूत करण्याच्या व्यापक मोहिमेचा भाग आहे. या कारवाईचा उद्देश महसूल गोळा करणे नसून, गैरव्यवहार करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण करणे आणि नियामक पूर्णपणे सतर्क आहे, हा संदेश देणे आहे.
फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्सवर कठोर भूमिका
फायनान्शिअल इन्फ्लुएन्सर्सवर बोलताना कमलेश वार्ष्णेय म्हणाले की, खरे शिक्षण देणारे आणि गुंतवणूकदारांची दिशाभूल करणाऱ्यांमध्ये फरक करणे महत्त्वाचे आहे. त्यांच्या मते, जर कोणी हमी परताव्याचा दावा करत असेल, गुंतवणुकीचे कॉल देत असेल किंवा क्लासरूममध्ये लाइव्ह मार्केट डेटा वापरत असेल, तर सेबी नोंदणीशिवाय हे शक्य नाही. मात्र, जे केवळ माहिती देतात त्यांना गुंतवणूकदार शिक्षणाच्या नावाखाली प्रोत्साहन दिले जाईल.