PM Kisan Scheme : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'पीएम किसान सन्मान निधी' योजनेच्या २३ व्या हप्त्याची प्रतीक्षा आता शिगेला पोहोचली आहे. मार्च २०२६ मध्ये गुवाहाटी, आसाम येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ वा हप्ता वितरित केल्यानंतर, आता शेतकरी २३ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. मात्र, नियमात बसूनही काही चुकांमुळे हा हप्ता थांबू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
२३ वा हप्ता कधी येणार?
अधिकृत घोषणा झाली नसली तरी, मीडिया रिपोर्टसनुसार २३ वा हप्ता जुलै २०२६ च्या सुमारास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी ६,००० रुपये, तीन समान हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) थेट बँक खात्यात (DBT) जमा करते.
हप्ता अडकू नये म्हणून 'या' ३ अटींची पूर्तता करा
- अनेक शेतकऱ्यांचे हप्ते केवळ कागदपत्रांच्या त्रुटींमुळे थांबतात. २३ व्या हप्त्यासाठी खालील तीन कामे पूर्ण असणे अनिवार्य आहे.
- ई-केवायसी : आधार कार्डचा वापर करून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असावी.
- आधार-बँक लिंकिंग : तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे गरजेचे आहे.
- भू-पडताळणी : जमिनीची कागदपत्रे आणि सरकारकडे असलेल्या नोंदींची पडताळणी झालेली असावी.
घरबसल्या 'असे' तपासा तुमचे नाव
- तुमचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे की नाही, हे पाहण्यासाठी खालील पायऱ्या फॉलो करा.
- पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर pmkisan.gov.in जा.
- 'Beneficiary List' या पर्यायावर क्लिक करा.
- तुमचे राज्य, जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- 'Get Report' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण यादी आणि हप्त्यांचे स्टेटस दिसेल.
अडचण आल्यास कोठे संपर्क साधाल?
जर तुम्ही पात्र आहात आणि तरीही हप्ता जमा झाला नसेल, तर सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. शेतकरी सकाळी ९:३० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात.
हेल्पलाइन क्रमांक : १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६
वाचा - सोने-प्लॅटिनमच्या आयातीवर कडक निर्बंध! आता 'लायसन्स'शिवाय इंपोर्ट अशक्य; दागिन्यांच्या किमती वाढणार?
योजनेचा इतिहास आणि व्याप्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २४ फेब्रुवारी २०१९ रोजी गोरखपूर येथून या योजनेचा शुभारंभ केला होता. सध्या ९.३ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळत आहे.
