PM Kisan Scheme : केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २१ वा हप्ता जाहीर केला आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी २६ सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या तीन राज्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये प्रत्येकी २,००० रुपये हस्तांतरित केले. या राज्यांमध्ये नुकत्याच आलेल्या पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे. पण, दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार? याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहे.
यापूर्वी २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी जारी करण्यात आला होता, ज्यात ९.७ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात २०,५०० कोटी रुपये जमा झाले होते.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार २१ वा हप्ता?
देशातील इतर राज्यांतील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरीही २१ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर २०२५ च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे. ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबांसाठी, विशेषतः सणासुदीच्या तोंडावर, मोठा दिलासा देणारी आहे.
लाभार्थी संख्या: महाराष्ट्रात सुमारे १.५ कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.
यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. पीएम किसानच्या या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चासाठी मोठी मदत होईल. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
५४० कोटींहून अधिक निधी हस्तांतरित
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील २७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात ५४० कोटींहून अधिक निधी हस्तांतरित करण्यात आला आहे. यामध्ये २.७ लाख महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे. शेतकऱ्यांना यामुळे तात्काळ घरगुती गरजा पूर्ण करण्यास, पुढील पेरणीसाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यास तसेच पुन्हा शेती सुरू करण्यास मदत होईल, असे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.
पीएम किसान योजनेबद्दल थोडक्यात
फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली. शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे, त्यांचे खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा उद्देश आहे. देशभरातील पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत ३ हप्त्यांमध्ये (प्रत्येकी २,००० रुपये) थेट बँक खात्यात मिळते.
लाभ मिळवण्यासाठी महत्त्वाची अट
ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य: लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचे ई-केवायसी पूर्ण केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे.
आधार-बँक खाते जोडणी: आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी हे पूर्ण केले नाही, त्यांना हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो किंवा तो नाकारला जाऊ शकतो.
वाचा - LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
लाभार्थ्यांची यादी कशी तपासावी?
शेतकरी त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे पीएम किसान पोर्टलवर (pmkisan.gov.in) जाऊन तपासू शकतात. 'फार्मर्स कॉर्नर' विभागात 'बेनिफिशरी स्टेटस' किंवा 'व्हिलेज वाईज लिस्ट' पर्याय निवडून आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून तपासणी करावी. अधिक माहितीसाठी पीएम किसान हेल्पलाइन १५५२६१ किंवा ०११-२४३००६०६ वर संपर्क साधावा.