PM Kisan 21st Installment : सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशभरातील शेतकरी सध्या त्यांच्या बँक खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २१ वा हप्ता जमा होण्याची वाट पाहत आहेत. या योजनेचा २० वा हप्ता ऑगस्ट २०२५ मध्ये जारी करण्यात आला होता. मात्र, आता शेतकरी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्र सरकारकडून यासंबंधी 'गोड बातमी' मिळेल, अशी आशा व्यक्त करत आहेत.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता
विविध माध्यमांतील माहितीनुसार, पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता छठ पूजेनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जारी होण्याची शक्यता आहे. सरकारने अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. दरम्यान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणा यांसारख्या आपत्तीग्रस्त राज्यांतील शेतकऱ्यांसाठी मात्र हा हप्ता सरकारने आधीच जारी केला आहे.
तर जम्मू-काश्मीरमधील पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी त्यांनाही २१ वा हप्ता 'अग्रिम' म्हणून देण्यात आला आहे. या राज्यांतील शेतकऱ्यांना आतापर्यंत ४,०५२ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे.
काय आहे पीएम किसान योजना?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना २०१९ च्या अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्यात आली होती. या योजनेचा मुख्य उद्देश देशातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दर चार महिन्यांनी २,००० रुपयांची रक्कम थेट पाठवते. म्हणजेच, वर्षातून एकूण ६,००० रुपयांची आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. ही संपूर्ण रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते, ज्यामुळे योजनेत पूर्ण पारदर्शकता टिकून राहते.
वाचा - नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
आता देशभरातील करोडो शेतकरी उत्सुकतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी या हप्त्याच्या तारखेची घोषणा करतात, याची वाट पाहत आहेत. नेहमीप्रमाणे या वेळीही एकाच वेळी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.
