PM Kisan Samman Nidhi Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक कल्याणकारी योजना चालवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत करते. ही रक्कम प्रत्येकी २,००० रुपयांच्या ३ हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे २० हप्ते जारी करण्यात आले असून, कोट्यवधी शेतकरी आता २१ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दिवाळीपूर्वी हप्ता येणार?
आगामी काळात अनेक सण-उत्सव येत आहेत, आणि त्यापाठोपाठ दिवाळीचा मोठा सणही जवळ आहे. त्यामुळे, अनेक शेतकरी बांधवांना आशा आहे की, दिवाळीच्या तोंडावर सरकार २१ वा हप्ता जारी करेल. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही.
गेल्या वर्षीच्या नियमांनुसार किंवा रेकॉर्डनुसार, पीएम किसान योजनेचा हप्ता दर ४ महिन्यांच्या अंतराने पाठवला जातो. सरकारने नुकताच २० वा हप्ता २ ऑगस्ट रोजी जारी केला होता. त्यामुळे, दिवाळीच्या मुहूर्तावर किंवा त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे.
कधीपर्यंत येणार पीएम किसानचा २१ वा हप्ता?
सध्याच्या अंदाजानुसार, पीएम किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता सरकारकडून डिसेंबर महिन्याच्या आसपास जारी केला जाऊ शकतो. मात्र, या तारखेची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीची वाट पाहावी.
वाचा - नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीचा एक महत्त्वाचा स्रोत बनली आहे. त्यामुळे, सरकार २१ वा हप्ता कधी जारी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.