Mukesh Ambani Salary : गुगल, मायक्रोसॉफ्ट, मेटा यांच्या सीईओंच्या पगाराची कायमच होत असते. परंतु, आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा पगार तुम्हाला माहिती आहे का? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी या वर्षीही त्यांचा पाच वर्षांचा जुना निर्णय कायम ठेवला आहे. हे सलग पाचवे वर्ष आहे, जेव्हा त्यांनी २०२५ या आर्थिक वर्षात कंपनीकडून कोणताही पगार घेतला नाही.
पगार न घेण्यामागचे कारण
मुकेश अंबानींनी हा निर्णय कोविड-१९ महामारीच्या काळात घेतला होता. जेव्हा संपूर्ण जग आर्थिक संकटाशी झुंजत होते, त्यावेळी त्यांनी आपले पगार, भत्ते आणि बोनस यांसारखे सर्व फायदे स्वेच्छेने सोडून देण्याचा निर्णय घेतला. याआधीही, आर्थिक वर्ष २००९ ते २०२० पर्यंत त्यांनी आपला वार्षिक पगार १५ कोटींपर्यंत मर्यादित ठेवला होता, तर कंपनी प्रमुख म्हणून त्यांना यापेक्षा बरेच काही मिळू शकले असते.
पगार नसतानाही अंबानी जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक
रिलायन्सकडून कोणताही पगार न घेताही, मुकेश अंबानी हे जगातील १८ व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या मते, ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती १०३.३ अब्ज डॉलर्स (सुमारे ८.६ लाख कोटी) आहे.
लाभांशातून होते बंपर कमाई
मुकेश अंबानी पगार घेत नसले तरी, रिलायन्समध्ये त्यांच्या असलेल्या ५०.३३% हिस्सेदारीमुळे ते कंपनीच्या लाभांशातून मोठी कमाई करतात. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, कंपनीने प्रति शेअर १० लाभांश जाहीर केला. आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत, मुकेश अंबानी आणि त्यांच्या मुलांकडे एकूण ६.४४ लाख कोटी शेअर्स आहेत. आर्थिक वर्ष २५ साठी लाभांशाची रेकॉर्ड तारीख १४ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे, ज्यामुळे अंबानी कुटुंबाला लाभांशाचा मोठा फायदा मिळेल.
अंबानींच्या मुलांना किती पगार?
मुकेश अंबानींची तिन्ही मुले, ईशा अंबानी पिरामल, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीचे नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर बनले. त्यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये प्रत्येकी २.३१ कोटी मानधन मिळाले. यात प्रत्येकी ६ लाख सिटिंग फी आणि प्रत्येकी २.२५ कोटी कमिशन समाविष्ट आहे, जी गेल्या वर्षीच्या १.०१ कोटींपेक्षा जास्त आहे.
इतर संचालकांचे वेतन
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकांपैकी निखिल आर. मेसवानी आणि हितल आर. मेसवानी यांना आर्थिक वर्ष २०२५ मध्ये प्रत्येकी २५ कोटी रुपये मिळाले, ज्यात पगार, भत्ते आणि कमिशनचा समावेश होता. त्याच वेळी पीएमएस प्रसाद यांना १९.९६ कोटी रुपये देण्यात आले. ऑगस्ट २०२३ मध्ये संचालक मंडळातून बाहेर पडलेल्या नीता अंबानी यांना आर्थिक वर्ष २०२४ मध्ये ९९ लाख रुपये मानधन मिळाले होते, तर आर्थिक वर्ष २५ च्या यादीत त्यांचे नाव नाही.
वाचा - ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
यावरून हे स्पष्ट होते की, मुकेश अंबानी कंपनीकडून पगार घेत नसले तरी, त्यांच्या मोठ्या भागभांडवलामुळे त्यांना लाभांशाच्या रूपात मोठी आर्थिक प्राप्ती होते, ज्यामुळे त्यांची श्रीमंती कायम आहे.