लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये झालेली गुंतवणूक सप्टेंबर महिन्यात ९ टक्क्यांनी घसरून ३०,४२१ कोटी रुपये इतकी राहिली आहे. ऑगस्टमध्ये ही गुंतवणूक ३३,४३० कोटी रुपये, तर जुलैमध्ये ४२,७०२ कोटी रुपये होती. भारतीय म्युच्युअल फंड संघटना (ॲम्फी)च्या आकडेवारीनुसार, सलग दुसऱ्या महिन्यात गुंतवणुकीत घट झाली असली तरी, हा इक्विटी फंडांमध्ये सलग ५५वा शुद्ध वाढीचा महिना ठरला आहे.
गुंतवणुकीतील चढ-उतार असूनही, एसआयपी ही गुंतवणूक पद्धत गुंतवणूकदारांसाठी स्थिर माध्यम ठरत आहे. सप्टेंबरमध्ये एसआयपीद्वारे गुंतवणुकीचे एकूण योगदान २९,३६१ कोटी रुपये झाले. ऑगस्ट महिन्यात हा आकडा २८,२६५ कोटी रुपये इतका होता. अस्थिर बाजारस्थितीतही स्थिर एसआयपी गुंतवणूक ही गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत सजगता दर्शवते.
बॉण्ड फंडातून मोठी माघार : सप्टेंबर महिन्यात बॉण्ड फंडांमधून तब्बल १.०२ लाख कोटी रुपयांची माघार झाली आहे. ऑगस्टमध्ये ही रक्कम फक्त ७,९८० कोटी रुपये होती.
गुंतवणूक का आटली?
मॉर्निंगस्टार इन्व्हेस्टमेंट रिसर्चने सांगितले की, मोठ्या गुंतवणुकीनंतर झालेली ही घट ही रचनात्मक नसून चक्रीय स्वरूपाची आहे.
इक्विरस वेल्थचे व्यवस्थापकीय संचालक अंकुर पुंज यांनी या घटीचे कारण भू-राजकीय अनिश्चितता असल्याचे सांगितले.
नवीन गुंतवणूकदार बाजारात येईनात
२०२५ च्या पहिल्या नऊ महिन्यांत नवीन डिमॅट खाती उघडणाऱ्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ४० % ने घटली असल्याचे समोर आले आहे.
मिड, स्मॉल कॅप शेअर्समध्ये मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. यावर्षी प्रत्येक महिन्यात सरासरी २४.२ लाख डिमॅट खाती उघडली गेली.