Property Prices : शहरी भागात महागलेल्या घरांच्या किमतींमुळे सर्वसामान्यांसाठी घर खरेदी करणे दिवसेंदिवस कठीण होत असताना, रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रिअल इस्टेट डेटा ॲनालिटिक्स फर्म PropEquity च्या अहवालानुसार, मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे येथील घरांच्या विक्रीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. याचा परिणाम घरांच्या किमतीवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्ती केली आहे.
जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत या दोन प्रमुख बाजारपेठांमध्ये विक्रीचे व्यवहार १७ टक्क्यांनी कमी झाले आहेत. मागील वर्षीच्या ५९,८१६ युनिट्सच्या तुलनेत या तिमाहीत केवळ ४९,५४२ युनिट्सची विक्री झाली आहे. या घसरणीचे मुख्य कारण घरांच्या किमतीत झालेली तीव्र वाढ आणि परिणामी मागणीत झालेली घट हे आहे.
मुंबई-पुण्यात मोठी घट
PropEquity च्या आकडेवारीनुसार, विक्रीतील घट स्पष्टपणे दिसून येते.
ठाणे (MMR): सर्वाधिक २८% ची घसरण (१४,८७७ युनिट्स).
पुणे: विक्रीत १६% ची घट (१७,७६२ युनिट्स).
- मुंबई: ८% ची घट आणि नवी मुंबईत ६% ची घट नोंदवली गेली आहे.
- घरांच्या किमती वाढल्यामुळे अनेक ग्राहकांनी खरेदीचा निर्णय पुढे ढकलल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
किमती कमी होण्याची शक्यता किती?
विक्रीतील घट सामान्यतः किमती कमी होण्याचे संकेत देते. परंतु, रिअल इस्टेट डेव्हलपर्सची संस्था CREDAI-MCHI मात्र ही चिंताजनक बाब मानत नाहीये. CREDAI-MCHI चे अध्यक्ष सुखराज नाहर यांच्या मते, ही घसरण केवळ एक तात्पुरते 'समायोजन' आहे. बाजारपेठेतील दीर्घकालीन मागणी अजूनही मजबूत आहे.
पायाभूत सुविधांचा आधार: मेट्रो कॉरिडोर, कोस्टल रोड आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे भविष्यात मागणी वाढेल.
'स्वस्थ' बाजाराचे संकेत: रुशी मेहता (CREDAI-MCHI सचिव) यांच्या मते, डेव्हलपर्स आता पुरवठा आणि मागणीमध्ये समन्वय साधत आहेत. ही घसरण बाजारासाठी एक 'स्वस्थ समायोजन' आहे.
डेव्हलपर्स मोठ्या प्रमाणात किमती कमी करतील अशी शक्यता सध्या तरी कमी आहे. कारण, ते पायाभूत सुविधा आणि वाढत्या खर्चाचा हवाला देत आहेत. मात्र, विक्री कमी झाल्याने आगामी सणासुदीच्या काळात डेव्हलपर्स आकर्षक ऑफर किंवा सूट देऊ शकतात.
सामान्य माणसाचे घर घेण्याचे स्वप्न होईल का पूर्ण?
घरांच्या किमतीत मोठी कपात होण्याची शक्यता नसली तरी, ही घसरण खरेदीदारांसाठी संधी निर्माण करू शकते. विक्रीचे आकडे खाली आल्यामुळे, ग्राहक डेव्हलपर्सकडे चांगल्या सवलतीसाठी किंवा किमतीत थोडी घासाघीस करण्यासाठी आग्रह करू शकतात.
कोणाचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर आता सणासुदीच्या काळात बाजारात असलेल्या इन्व्हेंटरीमध्ये चांगले डील मिळण्याची शक्यता आहे.
दीर्घकाळात गुंतवणूकदारांचा विश्वास: CREDAI-MCHI कोषाध्यक्ष निकुंज सांगवी यांच्या मते, स्थिर व्याजदर आणि RERA मुळे गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत आहे. त्यामुळे स्वस्त आणि मिड-सेगमेंट घरांसाठी धोरणात्मक प्रोत्साहन मिळाल्यास दुसऱ्या सहामाहीत मागणी वाढेल.
वाचा - सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
या सर्व घटकांचा अर्थ असा आहे की, घरांच्या दरात मोठी 'क्रॅश' येणार नसला तरी, बाजार आता विक्रेत्याकडून खरेदीदाराच्या बाजूने थोडा झुकलेला दिसत आहे. त्यामुळे ज्यांना घर खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यासाठी आणि चांगले डील मिळवण्यासाठी योग्य काळ असू शकतो.