PM Kisan 21st Installment : देशातील ९ कोटी शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर आज संपली आहे. जर तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल, तर लगेच तुमचे बँक खाते तपासा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, आंध्र प्रदेशमधील कोईम्बतूर येथून या बहुप्रतीक्षित २१ व्या हप्त्याची रक्कम जारी केली आहे. सणासुदीनंतर आणि रब्बी पेरणीच्या अत्यंत महत्त्वाच्या वेळी मिळालेली ही आर्थिक मदत शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरली आहे.
९ कोटी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू
केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली होती की, पंतप्रधान मोदी आज (बुधवार, १९ नोव्हेंबर) दुपारी सुमारे दीड वाजता देशातील जवळपास ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम ट्रान्सफर करतील. ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा उशीर झाला असला तरी, हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे.
'या' राज्यांना आधीच मदत
देशाच्या बहुतांश भागांमध्ये आज २१ वा हप्ता जारी करण्यात आला असला तरी, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीर यांसारख्या काही राज्यांतील शेतकऱ्यांना ही रक्कम सरकारने आधीच दिली आहे. या राज्यांनी नुकताच पूर आणि भूस्खलनासारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना केला होता. या संकटकाळात शेतकऱ्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने २१ व्या हप्त्याची वाट न पाहता, अग्रिम पेमेंट केले होते.
तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत?
पैसे न मिळण्याचे सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसणे. सरकार फसवणूक टाळण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करत आहे.
जर तुमच्या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये, आधार कार्डात किंवा बँक खात्याच्या नावामध्ये कोणतीही चुकीची माहिती असेल, तर तुमची रक्कम अडकण्याची शक्यता आहे.
दिलासा आणि उपाय
ही समस्या सोडवता येते. तुम्ही पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन किंवा तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर येथे जाऊन तुमची ई-केवायसी त्वरित पूर्ण करू शकता. एकदा कागदपत्रे आणि माहिती योग्य झाल्यावर, थांबलेला हप्ता पुढील प्रक्रियेत तुमच्या खात्यात जमा केला जाईल.
वाचा - जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
लाभार्थीची स्थिती कशी तपासावी?
- सर्वप्रथम pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
- होमपेजवर खाली 'फार्मर कॉर्नर' दिसेल. त्यातील 'लाभार्थी सूची' या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचे राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
- शेवटी 'रिपोर्ट प्राप्त करा' वर क्लिक केल्यास, तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी दिसेल.
