मुंबई : जगभरात वाढलेली युद्धाची भीती आणि परकीय गुंतवणूकदारांनी (एफआयआय) काढलेला हात यामुळे भारतीय शेअर बाजाराला हादरा बसला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 'सेन्सेक्स' ९६१.४२ अंकांनी कोसळून ८१,२८७.१९ वर स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 'निफ्टी' ३१७.९० अंकांनी घसरून २५,१७८.६५ वर बंद झाला. या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे एकाच दिवसांत ४.९८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
घसरणीमुळे बाजारातील प्रमुख कंपन्यांचे भांडवल एकाच दिवसांत ४,९८,६०३.४२ कोटी रुपयांनी कमी होत ५.१० हजार अब्ज डॉलरवर आले आहे. आठवड्याचा विचार करत सेन्सेक्स १,५२७.५२ अंकांनी (१.८४%), तर एनएसई निफ्टी ३९२.६ अंकांनी किंवा १.५३ टक्क्यांनी घसरला आहे.
पडझडीची प्रमुख कारणे
अमेरिका-इराण चर्चेत यश न आल्याने युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची भीती.
गुरुवारी विदेशी गुंतवणूकदारांनी 3 सुमारे ३,४६५ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्रीचा मारा केला.
ऑटो, रियल्टी, टेलिकॉम आणि 3 एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये २ टक्क्यांपर्यंत घसरण.
अमेरिकन आणि आशियाई ४ बाजारातील कमकुवत स्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आहे.
कच्चे तेल महागले
अमेरिका आणि इराण यांच्यातील अण्वस्त्र कराराबाबतच्या वाटाघाटीत कोणतीही प्रगती न झाल्याने मध्य पूर्वेत युद्धाचे ढग गडद होण्याची भीती निर्माण झाली आहे.
याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला असून, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव १.२६ टक्क्यांनी वधारून ७१.६४ डॉलरवर पोहोचले आहेत. यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहेत.
