नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दसरा आणि दिवाळीची भेट गणेशोत्सवातच दिली. जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करण्यास मान्यता दिल्यानंतर आता अनेक वस्तू घटस्थापनेपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून स्वस्त होणार आहेत. त्यामुळे यंदाची दिवाळी खरेदी जोरदार होईल. विमांच्या प्रीमियमवर जीएसटी लागणार नाही.
जीएसटी परिषदेच्या ५६व्या बैठकीत ५% आणि १८% जीएसटी दरांना मंजुरी मिळाली. २२ सप्टेंबरपासून त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. ट्रम्प टॅरिफमुळे बसणारा फटका या निर्णयामुळे कमी होईल.
जीएसटी ०%
वैयक्तिक आरोग्य व जीवन विमा, नकाशे, चार्ट्स, ग्लोब, पेन्सिल, शार्पनर, खडू, रंगीत पेन्सिली, वह्या व नोटबुक्स, खोडरबर
जीएसटी ५%
केसांचे तेल, शॅम्पू, टूथपेस्ट, साबण, टूथ ब्रश, शेव्हिंग क्रीम, लोणी, तूप, चीज, दुग्धजन्य पदार्थ, पॅकेज्ड नमकीन, भुजिया, भांडी, बाळांसाठीच्या बाटल्या, नॅपकीन व डायपर्स, शिवणयंत्र व त्याचे भाग, ट्रॅक्टर टायर व भाग, ट्रॅक्टर, ठराविक जैव-कीटकनाशके, सूक्ष्म पोषकद्रव्ये, ठिबक सिंचन प्रणाली व स्प्रिंकलर, कृषी, बागायती, कृषी यंत्रे व अवजारे, तापमापक, ऑक्सिजन, सर्व निदान किट्स, ग्लुकोमीटर व टेस्ट स्ट्रिप्स, चष्मे
जीएसटी १८% - एअर कंडिशनर, टेलिव्हिजन (३२ इंचापेक्षा जास्त, एलईडी/एलसीडी), मॉनिटर्स व प्रोजेक्टर, डिशवॉशिंग मशीन, पेट्रोल-एलपीजी-सीएनजी हायब्रिड कार (१२०० सीसी व ४००० मिमी पर्यंत), डिझेल-हायब्रिड कार (१५०० सीसी व ४००० मिमी पर्यंत), तीन चाकी वाहने, मोटरसायकल (३५० सीसी पर्यंत), मालवाहू मोटर वाहने
ही प्रत्येक भारतीयासाठी दिवाळीची भेट आहे. दैनंदिन वस्तू स्वस्त होतील, लघु व मध्यम उद्योगांना मोठा फायदा होईल
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
जोपर्यंत राज्यांना महसुलाची तूट भरून काढण्यासाठी घेतलेले कर्ज फेडले जात नाही तोवर गुटखा, तंबाखू उत्पादने आणि सिगारेटवरील २८% कर लागूच राहील.
निर्मला सीतारामन, अर्थमंत्री
जीएसटी ४०% - तंबाखू उत्पादने, शीतपेय (कार्बोनेटेड बेव्हरेजेस), मध्यम व मोठ्या आकाराच्या कार, ३५० सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकली
इन्शुरन्स होणार स्वस्त
केंद्र सरकारने वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी दर थेट १८ टक्क्यांवरून शून्य केल्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यामुळे वार्षिक २० हजार रुपये आरोग्य विम्याचा हप्ता असेल तर त्यावर थेट ३,६०० रुपयांची मोठी बचत होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटी कमी करण्याची मागणी प्रथम केली होती. त्यांच्या मागणीला यश आले आहे.
जीएसटी दर रचना
सध्या नवे
५% ५%
१२% १८%
१८% *४०%
२८% *(विशेष वस्तू)
०.५% इतका फायदा जीएसटी दर रचनेमधील बदलांमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो.
१२०० सीसीपर्यंतची १० लाखांची पेट्रोल-एलपीजी-सीएनजी हायब्रिड कार घेतली तर?
उत्तर : यापूर्वी २८% जीएसटी असल्याने १० लाखांच्या कारसाठी २ लाख ८० हजार रुपये जीएसटी जात होता. आता १८ टक्के जीएसटी झाल्याने ग्राहकांची
१ लाख रुपयांची थेट बचत होणार आहे.