Apple Vs Alphabet Inc. : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हटलं की ॲपलचे नाव पहिल्यांदा घेतलं जात होतं. मात्र, ही गोष्ट आता इतिहासजमा झाली आहे. भारतीय नेतृत्वाच्या जोरावर दुसऱ्या एका कंपनीने ॲपलला मागे टाकलं आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई यांच्या नेतृत्वाखालील गुगलची मूळ कंपनी 'अल्फाबेट इंक'ने दिग्गज आयफोन निर्मात्या ॲपलला मागे टाकून जगातील दुसरी सर्वात मौल्यवान कंपनी बनण्याचा मान मिळवला आहे. २०१९ नंतर प्रथमच अल्फाबेटने ॲपलवर मात केली असून, या विजयाचे श्रेय कंपनीच्या प्रगत 'एआय' तंत्रज्ञानाला दिले जात आहे.
बाजार मूल्याचे नवे समीकरण
बुधवारी अमेरिकन बाजार बंद होताना तंत्रज्ञान कंपन्यांच्या क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली. एनवीडिया कंपनी ४.६०४ ट्रिलियन डॉलरच्या बाजारमूल्यासह आजही पहिल्या क्रमांकावर कायम आहे. मात्र, दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत अल्फाबेटने ३.८९२ ट्रिलियन डॉलर मूल्याचा टप्पा गाठला. याच वेळी ॲपलची बाजारपेठेतील किंमत ३.८६३ ट्रिलियन डॉलर इतकी नोंदवण्यात आली, ज्यामुळे ॲपलची आता तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
अल्फाबेटची 'रॉकेट' भरारी
अल्फाबेटच्या शेअर्समध्ये बुधवारी २.५१ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आणि शेअर ३२२.४३ डॉलरवर बंद झाला. गेल्या वर्षभरात अल्फाबेटने आपल्या गुंतवणूकदारांना ६४.७३ टक्के इतका भरघोस परतावा दिला आहे. याउलट, ॲपलच्या शेअरमध्ये गेल्या वर्षभरात केवळ ७.४९ टक्के वाढ झाली असून बुधवारी तो ०.७७ टक्क्यांनी घसरला.
यशाचे गुपित : 'Gemini' आणि 'Waymo'
अल्फाबेटच्या या ऐतिहासिक मुसंडीमागे दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले म्हणजे गुगलचे जनरेटिव्ह एआय प्लॅटफॉर्म 'जेमिनी'. याचा जगभरात वाढलेला वापर कंपनीसाठी गेमचेंजर ठरला आहे. दुसरे कारण म्हणजे 'वेमो' ही रोबोटॅक्सी सेवा. अल्फाबेटची ही उपकंपनी अमेरिकेतील रोबोटॅक्सी मार्केटमध्ये आघाडीवर आहे. सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि ऑस्टिन यांसारख्या मोठ्या शहरांत वेमोची व्यावसायिक सेवा यशस्वीपणे सुरू आहे.
वाचा - १ फेब्रुवारी हीच बजेट सादरीकरणाची तारीख का निवडली? भारतीय अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास
सुंदर पिचाई यांचा प्रवास
आयआयटी खरगपूरमधून इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर सुंदर पिचाई यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. २००४ मध्ये गुगलमध्ये मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून रुजू झालेल्या पिचाई यांनी आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधले. २०१५ मध्ये ते गुगलचे आणि २०१९ मध्ये अल्फाबेटचे सीईओ बनले. त्यांच्याच नेतृत्वाखाली कंपनीने आज हे जागतिक यश संपादन केले आहे.
