Fuel Crisis India:इराण-अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर जगभरातील तेलपुरवठा खंडित झाला आहे. भारतामध्येही इंधनाची टंचाई जाणवत आहे. अशा परिस्थितीत, इराणमधून सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल घेऊन आलेला एक टँकर गुजरात किनाऱ्यावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या टँकरबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने भारतीय तेल कंपन्यांनी हे इराणी तेल स्वीकारण्यास नकार दिला आहे.
गुप्ततेत आलेला टँकर चर्चेत
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या अहवालानुसार, ‘डेर्या’ नावाचा एक अतिमोठा क्रूड कॅरियर मंगळवारी गुजरातमधील बंदरावर दाखल झाला. Kpler या वेसल ट्रॅकिंग संस्थेच्या माहितीनुसार, या टँकरमध्ये २८ मार्च रोजी इराणी कच्चे तेल भरले गेले होते. मात्र, ही तारीख अमेरिकेने दिलेल्या निर्बंध सवलतीच्या कालावधीबाहेरची असल्याने हा माल वादग्रस्त ठरत आहे.
अमेरिकन निर्बंधांमुळे अडचण
२० मार्च रोजी अमेरिकेच्या प्रशासनाने जागतिक तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी काही अटींसह ३० दिवसांची सवलत जाहीर केली होती. या सवलतीनुसार २० मार्चपूर्वी टँकरमध्ये भरलेले इराणी तेल १९ एप्रिलपर्यंत विक्रीस परवानगी होती. परंतु ‘डेर्या’ टँकरमध्ये तेल २८ मार्चला भरले गेले असल्याने ते या सवलतीच्या कक्षेबाहेर येते. त्यामुळे हा माल स्वीकारल्यास संबंधित खरेदीदारांवर अमेरिकेचे ‘सेकंडरी सॅन्क्शन्स’ लागू होऊ शकतात.
भारतीय रिफायनऱ्यांची सावध भूमिका
अशा परिस्थितीत भारतीय रिफायनऱ्या हे तेल स्वीकारण्यास टाळाटाळ करत आहेत. यापूर्वी भारताने सवलतीच्या कालावधीत काही इराणी तेल खरेदी केले होते, मात्र ते व्यवहार नियमांनुसार करण्यात आले होते.
चीन खरेदी करणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, या टँकरमधील तेलासाठी चीन व्यतिरिक्त अन्य खरेदीदार मिळणे कठीण आहे. जागतिक शिपिंग डेटाबेसनुसार, हा टँकर अमेरिकेच्या निर्बंधाखाली असून, इराणच्या नॅशनल इराणी टँकर कंपनीद्वारे चालवला जात आहे.
