Share Market Today: भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा एकदा मोठी घसरण पाहायला मिळाली. कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारातील स्थिती नकारात्मक राहिली आणि गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं. गुरुवारी व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ९५२.६१ अंकांच्या भारी घसरणीसह ७५,९११.१० च्या स्तरावर आला. त्याच वेळी, निफ्टी २८९.६० अंकांनी घसरून २३,५७७.२५ च्या स्तरावर व्यवहार करताना दिसला. बाजाराची स्थिती इतकी बिकट होती की, सुमारे १,५९७ शेअर्समध्ये घसरण नोंदवली गेली, तर केवळ ६४३ शेअर्सच ग्रीन झोनमध्ये होते.
'या' शेअर्समुळे बाजाराचं कंबरडं मोडलं
आजच्या घसरणीमध्ये बँकिंग आणि एव्हिएशन क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांचा मोठा वाटा राहिला. निफ्टीवर सर्वाधिक नुकसान सोसाव्या लागलेल्या शेअर्समध्ये इंटरग्लोब एव्हिएशन (इंडिगो), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), एलअँडटी (L&T) आणि कोटक महिंद्रा बँक यांचा समावेश आहे. बाजाराच्या या 'त्सुनामी'मध्ये केवळ कोल इंडिया सारखे मोजकेच शेअर्स वाढ नोंदवण्यात यशस्वी ठरले.
Telegram युझर्सना मोठा झटका; पायरसीमुळे ३१४२ चॅनेल्सवर सरकारची टांगती तलवार, पाहा डिटेल्स
रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीच्या जवळ
शेअर बाजारासोबतच भारतीय रुपयानंही घसरणीचे नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. आज रुपया डॉलरच्या तुलनेत ९२.३३ च्या स्तरावर पोहोचला, जो आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी स्तराच्या (९२.३६) अत्यंत जवळ आहे. परदेशी गुंतवणूकदारांकडून भारतीय बाजारातून पैसा काढून घेतला जाणं आणि जागतिक अस्थिरता ही रुपयाच्या घसरणीची मुख्य कारणं आहेत.
घसरणीचं नेमकं कारण काय?
बाजार तज्ज्ञांच्या मते, मध्य-पूर्वेतील युद्धाची स्थिती आणि तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी पुरवठ्यावर लादलेले निर्बंध यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. इंधनाची टंचाई आणि जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाल्यामुळे भारतासारख्या आयात-अवलंबित देशाच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे.
