Grok AI Controversy : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. इलॉन मस्क यांच्या 'Grok AI' या चॅटबॉटचा वापर करून महिलांचे अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो तयार केले जात असल्याच्या तक्रारीनंतर, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'X' ला कडक शब्दांत तंबी दिली आहे. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी सरकारने ७ जानेवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
नेमके प्रकरण काय?
काही युजर्स 'X' वर बनावट खाती तयार करून त्यावर महिलांचे मूळ फोटो अपलोड करत आहेत. त्यानंतर 'Grok AI' ला विशिष्ट 'प्रॉम्प्ट' देऊन त्या फोटोंचे विद्रुपीकरण केले जाते. AI च्या मदतीने कपडे बदलणे किंवा फोटो लैंगिकदृष्ट्या आक्षेपार्ह बनवणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. 'Grok' ही एआय सिस्टीम अशा चुकीच्या मागण्यांना अटकाव करण्याऐवजी त्या स्वीकारत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रियंका चतुर्वेदींनी वेधले लक्ष
शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांना पत्र लिहून या विषयावर चिंता व्यक्त केली होती. "एआयच्या मदतीने महिलांच्या अस्सल फोटोंचे आक्षेपार्ह रूपात रूपांतर करणे ही अत्यंत गंभीर बाब असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे," असे त्यांनी पत्रात नमूद केले होते.
'X' चे कायदेशीर संरक्षण धोक्यात!
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ७९ अंतर्गत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना 'मध्यस्थ' म्हणून कायदेशीर संरक्षण मिळते. म्हणजेच, युजर्सनी पोस्ट केलेल्या मजकुरासाठी प्लॅटफॉर्म जबाबदार नसतो. मात्र, जर 'X' ने या अश्लील मजकुरावर लगाम लावला नाही, तर हे संरक्षण काढून घेतले जाईल. रक्षण संपल्यास, 'X' वर थेट आयटी कायदा आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत फौजदारी कारवाई केली जाईल.
वाचा - एक खुलासा आणि रिलायन्सचे शेअर्स धडाम! एका दिवसात १ लाख कोटी स्वाहा; गुंतवणूकदारांनी काय करावे?
मंत्रालयाने सुरुवातीला ७२ तासांची मुदत दिली होती, परंतु नंतर ती कमी करून ४८ तास करण्यात आली. त्यानुसार ७ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत 'X' ला आपला कृती अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात 'Grok AI' चा गैरवापर रोखण्यासाठी कंपनीने कोणते तांत्रिक बदल केले आहेत, याची माहिती द्यावी लागेल.
