Women Cricketers : भारतीय महिला क्रिकेटपटूंनी केवळ मैदानातच ऐतिहासिक कामगिरी केली नाही, तर आता ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीतही त्यांनी पुरुष खेळाडूंच्या जवळपास मजल मारली आहे. नुकताच महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्स आणि दीप्ती शर्मा यांसारख्या खेळाडूंची लोकप्रियता जबरदस्त वाढली आहे.
'ईटी'ने जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स आणि बेसलाइन व्हेंचर्ससारख्या क्रीडा व्यवस्थापन संस्थांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या महिला क्रिकेटपटूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये १००% पेक्षा जास्त वाढ नोंदवण्यात आली आहे. हरमनप्रीत आणि स्मृती मंधाना यांच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्या दुप्पट झाली असून, ब्रँड्समध्ये त्यांना साईन करण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे.
किती वाढली ब्रँड व्हॅल्यू?
विश्वचषक जिंकण्यापूर्वी भारतातील अव्वल महिला क्रिकेटपटूंची ब्रँड व्हॅल्यू सरासरी ३० लाख रुपयांपासून ते १.५ कोटी रुपयांपर्यंत होती. मात्र, या ऐतिहासिक विजयानंतर त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.
| खेळाडूंचा गट | विश्वचषकपूर्वीची ब्रँड व्हॅल्यू (सरासरी) | विश्वचषकनंतरची ब्रँड व्हॅल्यू (सरासरी) | 
| टॉप महिला क्रिकेटपटू | ३० लाख ते १.५ कोटी रुपये | ६० लाख ते ३ कोटी रुपये | 
| विराट कोहली (तुलनात्मक) | ४.५ कोटी ते ८ कोटी रुपये | - | 
| इतर पुरुष क्रिकेटपटू (तुलनात्मक) | १.५ कोटी ते ४ कोटी रुपये | - | 
विश्वचषक जिंकल्यापासून महिला क्रिकेटपटूंना विविध ब्रँड्सकडून सातत्याने नवनवीन ऑफर्स मिळत आहेत.
स्मृती मंधानाची फी सर्वाधिक
स्मृती मंधाना ही सध्या १६ हून अधिक ब्रँड्सना एंडोर्स करते. ती एंडोर्समेंटसाठी सर्वाधिक शुल्क घेणाऱ्या भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्ये आघाडीवर आहे. ती प्रति ब्रँडसाठी १.२ कोटी ते २ कोटी रुपये इतके शुल्क आकारते. दुसरीकडे, जेमिमा रॉड्रिग्स रेड बुल, बोट, नाइके आणि सर्फ एक्सेलसारख्या मोठ्या कंपन्यांचा चेहरा बनली आहे आणि तिची साइनिंग फी ७५ लाख ते १.५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
कोणत्या कंपन्या आहेत रांगेत?
फिटनेस, हेल्थ सप्लिमेंट्स आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या कंपन्या महिला क्रिकेटपटूंसोबत वेगाने करार करत आहेत. हर्बालाईफ आणि नाइके यांसारखे ब्रँड्स यात आघाडीवर आहेत. याशिवाय, बोट, प्यूमा, ॲडिडास, सर्फ एक्सेल आणि कोका-कोला सारख्या कंपन्यांनीही महिला खेळाडूंना आपले ब्रँड फेस म्हणून निवडले आहे.
वाचा - तुमचा आधारशी लिंक मोबाईल नंबर बंद झाला? काळजी करू नका, अशा प्रकारे जोडा नवीन नंबर
टेक कंपन्या आणि वित्तीय संस्थाही स्पर्धेत
गुगल जेमिनी आणि बोट सारखे टेक ब्रँड्स महिला खेळाडूंना त्यांच्या नवीन डिजिटल मोहिमांमध्ये सामील करत आहेत. तर एसबीआय, पीएनबी मेटलाईफ इन्शुरन्स, ह्युंदाई आणि महिंद्रा ग्रुप यांसारखे मोठे कॉर्पोरेट ब्रँड्स महिला खेळाडूंसोबतची भागीदारी वाढवत आहेत. महिला क्रिकेटपटूंनी मिळवलेली ही वाढती ब्रँड व्हॅल्यू, भारतीय क्रीडा अर्थव्यवस्थेत महिला खेळाडूंचे महत्त्व वाढत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे.
