Akshaya Tritiya Gold Buying: अक्षय तृतीया हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जाणारा सण आहे. आजच्या दिवशी सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घेणंही आवश्यक आहे. खरेदीपूर्वी सोन्याचे दर, त्याची शुद्धता आणि योग्य पडताळणी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे.
सोन्याचे ताजे दर (प्रति १० ग्रॅम)
भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार ताजे दर पुढीलप्रमाणे आहेत:
- २४ कॅरेट सोनं: ₹१,५१,६६०
- २२ कॅरेट सोनं: ₹१,४८,०२०
- २० कॅरेट सोनं: ₹१,३४,९७०
- १८ कॅरेट सोनं: ₹१,२२,८४०
- १४ कॅरेट सोनं: ₹९७,८२०
हे दर देशभर समान असले तरी दागिने खरेदी करताना GST आणि मेकिंग चार्जेस वेगळे आकारले जातात, त्यामुळे अंतिम किंमत वाढते.
MCX वर सोन्या-चांदीचा ट्रेंड
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर मागील आठवड्यात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला १० ग्रॅम सोनं ₹१,५२,६४२ रुपयांना होतं, तर तेच आठवड्याच्या शेवटी ₹१,५४,६०५ / १० ग्रॅम वर पोहोचला आहे. म्हणजेच, एका आठवड्यात सोन्याचे दर ₹१,९५३ रुपयांनी वाढले. मात्र, सोन्याचा उच्चांक ₹२,०२,९८४ असल्याने, सध्या ते अजूनही सुमारे ₹४८,००० ने स्वस्तच आहेत.
सोनं खरं की, खोटं? तपासण्याचे सोपे उपाय
अक्षय तृतीयेच्या गर्दीत फसवणूक टाळण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा-
१. BIS हॉलमार्क तपासा
९१६ = २२ कॅरेट (९१.६% शुद्ध)
७५० = १८ कॅरेट (७५% शुद्ध)
५८५ = १४ कॅरेट (५८५5% शुद्ध)
२. आवश्यक मार्किंग तपासा
प्युरिटी कोड
टेस्टिंग सेंटर मार्क
ज्वेलरचा ओळख कोड
हॉलमार्क तारीख
३. BIS Care App वापरा
HUID (६ अंकी कोड) टाकून सोन्याची शुद्धता आणि ज्वेलरची माहिती सहज तपासता येते.
आता सोनं खरेदी करणं योग्य का?
अक्षय तृतीया हा शुभ मुहूर्त असला तरी भावनिक निर्णय घेण्याऐवजी माहितीपूर्ण खरेदी करणे अधिक महत्त्वाचे आहे. सध्या सोन्याचा दर ₹१.५० लाखांच्या पुढे असला तरी तज्ञांच्या मते, सोन्याचे दीर्घकालीन फंडामेंटल मजबूत आहेत. एकदम मोठी खरेदी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने (SIP पद्धतीने) गुंतवणूक करावी. दर घसरल्यावर थोडं-थोडं सोनं खरेदी करणे अधिक फायदेशीर आहे.
(टीप- या बातमीत फक्त सोन्याच्या दरांविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
