Home Loan : अनेकजण गृहकर्जाचं आयुष्यभर ओझं नको म्हणून एकरकमी खरेदी करण्याचा निर्णय घेतात. कारण, त्यांना वाटतं की गृहकर्ज घेतल्यास घराच्या किमतीपेक्षा जास्त पैसे भरावे लागतील. पण, याच रकमेचं तुम्ही योग्य नियोजन केलं तर गृहकर्ज काढूनही तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. हो, तुम्ही बरोबर वाचलत. चला कसे ते पाहू. तुमच्याकडे घर खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम (उदा. ₹५० लाख) तयार असेल, तर संपूर्ण रक्कम एकाच वेळी घरात गुंतवण्याऐवजी 'स्मार्ट' आर्थिक नियोजन करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. आर्थिक तज्ज्ञांच्या मते, संपूर्ण रक्कम घरात गुंतवून 'डेड ॲसेट' करण्याऐवजी, त्याचा काही भाग गुंतवणुकीत वळवल्यास २० वर्षांत कोट्यवधींची संपत्ती निर्माण करता येते.
यासाठी 'होम लोन घ्या आणि उरलेले पैसे म्युच्युअल फंडात गुंतवा' हा मंत्र उपयुक्त ठरतो.
'स्मार्ट कमाई'चा मार्ग काय आहे?
- डाऊन पेमेंट : फक्त १० लाख रुपये डाऊन पेमेंट म्हणून भरा.
- होम लोन : उर्वरित रकमेसाठी (उदा. ४० लाख रुपये) होम लोन घ्या.
- गुंतवणूक: उरलेले ४० लाख रुपये म्युच्युअल फंडात एसआयपी किंवा एकरकमी गुंतवा.
- जर तुम्ही हे ४० लाख रुपये म्युच्युअल फंडात दीर्घकाळ (उदा. २० वर्षे) गुंतवले आणि त्यावर सरासरी १२% परतावा मिळाला, तर २० वर्षांनंतर ही रक्कम अंदाजे ३.८५ कोटी रुपयांपर्यंत वाढू शकते!
३% चा अतिरिक्त फायदा
गृहकर्जावर व्याज : होम लोनवर सध्या सरासरी ९% व्याज द्यावे लागते.
म्युच्युअल फंड परतावा: चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडांकडून सरासरी १२% किंवा त्याहून अधिक परतावा मिळण्याची शक्यता असते.
याचा अर्थ असा की, तुम्ही तुमच्या पैशांवर किमान ३% चा अतिरिक्त फायदा कमावत आहात. दीर्घकाळात, हे ३% चा फरक लाखो नव्हे, तर करोडोंमध्ये रूपांतरित होतो. संपूर्ण रक्कम कॅशमध्ये घर खरेदी केल्यास हा फायदा मिळवता येत नाही.
कर बचतीचा दुहेरी लाभ
कलम ८०C : होम लोनच्या मूळ रकमेवर कर सवलत मिळते.
कलम २४(b) : होम लोनच्या व्याजावर दरवर्षी २ लाख रुपयांपर्यंतची कर सवलत मिळते.
म्हणजेच, कर्ज घेऊन तुम्ही घर तर मिळवताच, पण त्याच वेळी कर बचत करून तुमची नेट इन्कम वाढवता.
कमी जोखमीत दोन मालमत्ता तयार होतील
कॅशमध्ये घर घेतल्यास तुमचे सर्व पैसे एकाच 'डेड ॲसेट'मध्ये अडकतात. पण, कर्ज घेतल्यास, तुम्ही एकाच वेळी दोन ॲसेट्स तयार करता—एक तुमचे घर आणि दुसरे वेगाने वाढणारे गुंतवणूक पोर्टफोलिओ. त्यामुळे तुमची संपत्ती दुप्पट वेगाने वाढते. सर्व पैसे एकाच ठिकाणी अडकण्याऐवजी, काही भाग म्युच्युअल फंडात गुंतवल्याने गुंतवणुकीतील जोखीम कमी होते. जर तुम्हाला खात्री असेल की, तुमच्या भागातील मालमत्तेचे दर लवकरच खूप वाढतील, तरच कॅशमध्ये घर खरेदी करणे फायदेशीर ठरू शकते. अन्यथा, बाजारातील परतावा मिळवत हळूहळू कर्ज फेडणे हाच आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम निर्णय ठरतो.
वाचा - 'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
