Health Insurance Vs Mediclaim : कोरोना काळानंतर लोक आरोग्याकडे गांभीर्याने पाहत आहेत. त्यामुळेच आरोग्य विमा घेण्याचे प्रमाण वाढलं आहे. आजकाल आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज बनली आहे. मात्र, 'मेडीक्लेम' आणि 'आरोग्य विमा' या दोन शब्दांमुळे अनेकदा सामान्य ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण होतो. अनेकदा लोक हे दोन्ही शब्द समानार्थी मानतात, पण त्यांच्या संरक्षणाच्या व्याप्तीमध्ये मोठा फरक आहे.
आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थितीसाठी योग्य आर्थिक नियोजन करण्यासाठी, या दोन्हीतील मुख्य फरक समजून घेणे आवश्यक आहे.
मेडीक्लेम म्हणजे काय?
- मेडीक्लेम ही आरोग्य विम्याची एक मूलभूत योजना आहे. ही योजना केवळ रुग्णालयात दाखल झाल्यावर होणारा खर्च भरून काढण्यासाठी तयार केलेली आहे.
- यात प्रामुख्याने रुग्णालयात दाखल झाल्यावर झालेला खर्च, शस्त्रक्रिया आणि उपचारांचा खर्च विम्याची रक्कम संपेपर्यंत दिला जातो.
- मेडीक्लेमची व्याप्ती मर्यादित असते. यात बाह्यरुग्ण विभाग उपचार, गंभीर आजारांवर एकरकमी लाभ किंवा मॅटर्निटी कव्हरेज यासारख्या सुविधा मिळत नाहीत.
- याचा मुख्य उद्देश अचानक येणाऱ्या मोठ्या हॉस्पिटल बिलापासून तुम्हाला दिलासा देणे हा असतो.
आरोग्य विमा म्हणजे काय?
- आरोग्य विमा ही व्यापक आणि सर्वसमावेशक योजना आहे. मेडीक्लेममध्ये मिळणाऱ्या सुविधांसोबतच यात अनेक अतिरिक्त फायदे मिळतात. मेडीक्लेम ही आरोग्य विम्याचाच एक प्रकार आहे. परंतु, आरोग्य विम्याची व्याप्ती खूप मोठी असते.
- यात केवळ रुग्णालयातील खर्चच नाही, तर गंभीर आजारांसाठी एकरकमी लाभ, दररोजच्या खर्चासाठी दैनिक रोख लाभ, ओपीडी, तसेच आरोग्य तपासणी आणि मॅटर्निटी कव्हरेज देखील मिळू शकते.
- आरोग्य विमा केवळ खर्चाची भरपाई करणारा नसून, गंभीर आजार झाल्यास विमाधारकाला एकरकमी मोठी रक्कम देणाराही असू शकतो.
- हा तुमच्या आरोग्याच्या खर्चाचे संपूर्णपणे नियोजन करतो.
मेडीक्लेम आणि आरोग्य विमा: मुख्य फरक
घटक | मेडीक्लेम | आरोग्य विमा |
व्याप्ती | मर्यादित. केवळ रुग्णालयातील खर्च. | व्यापक. रुग्णालयातील खर्चासह अनेक गोष्टी समाविष्ट. |
लाभ स्वरूप | भरपाई . खर्चाएवढी रक्कम परत मिळते. | भरपाई आणि लाभ. खर्चाची परतफेड किंवा निश्चित रक्कम (उदा. गंभीर आजारांसाठी) मिळते. |
गंभीर आजार | सामान्यतः समाविष्ट नसतो. | समाविष्ट असत किंवा रायडर म्हणून निवडता येतो. |
अतिरिक्त फायदे | उपलब्ध नसतात. | OPD, मॅटर्निटी, हेल्थ चेकअप इत्यादी फायदे मिळू शकतात. |
विमा राशी | तुलनेने कमी. | गरजेनुसार मोठी विम्याची रक्कम निवडता येते. |
आर्थिक नियोजन आणि सल्ला
तुम्ही जर फक्त मूलभूत आर्थिक संरक्षण शोधत असाल, तर मेडीक्लेम उपयुक्त ठरू शकतो. मात्र, गंभीर आजार, बाह्यरुग्ण उपचार किंवा कौटुंबिक नियोजन यांसारख्या मोठ्या गरजांसाठी आरोग्य विमा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
वाचा - सासऱ्यांची ७ लाख कोटींची कंपनी, पत्नी अब्जाधीश; माजी पंतप्रधान मायक्रोसॉफ्टमध्ये करणार जॉब
आजच्या महागाईच्या काळात, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी जास्त विम्याची रक्कम असलेला आरोग्य विमा घेणे हे आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे.