Insurance Coverage : देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाच्या घटनेने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसोबतच विमा संरक्षणाबद्दल अनेक शंका आणि प्रश्न निर्माण केले आहेत. जीवन विमा पॉलिसी 'आयुष्यासह आणि आयुष्यानंतरही' तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या संरक्षणाची हमी देते. पण, दहशतवादी हल्ले त्यात समाविष्ट असतात का? आपल्या सामान्य जीवन विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी घटनांमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळू शकते की त्यासाठी विशेष विमा किंवा 'ॲड-ऑन' घेणे आवश्यक आहे? चला जाणून घेऊया.
पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये काय तपासावे?
दहशतवादी घटना क्वचितच घडत असल्या तरी, यात मानवी जीवनाचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊ शकते. वाहनांच्या विम्यामध्ये अशा आपत्कालीन घटना कव्हर होतात, पण मानवी जीवनाबद्दल नेमके नियम काय आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सर्व विमा पॉलिसींमध्ये दहशतवादी घटनांचा समावेश नसतो. अनेक पॉलिसींमध्ये दहशतवादी घटना कव्हर करण्यासाठी तुम्हाला वेगळी निवड करावी लागते किंवा त्यासाठी स्वतंत्रपणे विमा पॉलिसी खरेदी करावी लागते. तुमच्या सध्याच्या जीवन विमा पॉलिसीमध्ये दहशतवादी घटना कव्हर होतात की नाही, हे तपासण्यासाठी पॉलिसी डॉक्युमेंटमधील 'अपवाद' कलम काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
सामान्यतः, जीवन विमा पॉलिसींमध्ये दहशतवादी घटना कव्हर केल्या जातात, जोपर्यंत त्या पॉलिसीमध्ये स्पष्टपणे 'अपवाद' म्हणून नमूद केलेल्या नाहीत. जर एखाद्या दहशतवादी हल्ल्यात विमाधारकाचा मृत्यू झाला, तर नॉमिनीला विम्याची रक्कम दिली जाते.
कशावर कव्हरेज मिळत नाही?
- जर विमाधारक स्वतः कोणत्याही दंगल किंवा हल्ल्यात सक्रियपणे सामील असेल, तर त्याला कव्हरेज दिले जात नाही. अनेक जीवन विमा पॉलिसींमध्ये युद्धासारख्या परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीचा समावेश केला जात नाही.
- २००१ मध्ये अमेरिकेत झालेल्या ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर, जगभरातील विमा कंपन्यांनी दहशतवादी हल्ल्यांचे कव्हरेज देणे थांबवले होते. यानंतर, एप्रिल २००२ मध्ये भारताने मोठी सुधारणा केली. भारताने इंडियन मार्केट टेररिझम रिस्क इन्शुरन्स पूलची स्थापना केली, ज्याचे व्यवस्थापन GIC Re करते.
- या पूलद्वारे मालमत्ता विमा पॉलिसींना दहशतवादी धोक्यांपासून सुरक्षा दिली जाते. देशातील सर्व विमा कंपन्या सामूहिक सहकार्याने या पूलद्वारे कव्हरेज देतात.
- आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या पूलमध्ये १,६५४.६३ कोटींचा प्रीमियम जमा झाला होता, तर नुकसान भरपाईपोटी केवळ ३.१२ कोटींचे क्लेम सेटल करण्यात आले.
वाचा - गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
दहशतवादासाठी 'इंडियन मार्केट टेररिझम रिस्क पूल'
कमाल कव्हरेज मर्यादा
- या पूलअंतर्गत, विमा कंपन्या एका दहशतवादी घटनेत एकाच ठिकाणी झालेल्या नुकसानीसाठी जास्तीत जास्त २,००० कोटी रुपयांपर्यंत कव्हरेज देऊ शकतात. जर एखाद्याला २,००० कोटींपेक्षा अधिकचा विमा दावा किंवा कव्हरेज हवा असेल, तर त्यासाठी स्वतंत्र 'स्टँडअलोन' विमा पॉलिसी किंवा 'ॲड-ऑन' खरेदी करावे लागते.
- मालमत्ता विम्यासाठी वेगळा पूल आहे, तर जीवन विमा पॉलिसींमध्ये दहशतवादी हल्ल्यामुळे झालेला मृत्यू बहुतांशी कव्हर होतो, मात्र तुमच्या पॉलिसी डॉक्युमेंटमधील अपवादांची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
