Health Insurance : आजच्या बदलत्या जीवनशैलीत आणि वाढत्या प्रदूषणामुळे आरोग्य विमा घेणे ही काळाची गरज बनली आहे. आपण मोठी बिले टाळण्यासाठी पॉलिसी घेतो, पण अनेकदा काही महत्त्वाच्या तपशिलांकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढवू शकते. यातील एक महत्त्वाची चूक म्हणजे 'गंभीर आजारांचे कव्हरेज' न घेणे.
बऱ्याचदा लोक आपला बेस हेल्थ इन्शुरन्स प्लॅन पुरेसा मानतात. पण, हृदयविकाराचा झटका, कर्करोग किंवा किडनी निकामी होणे यांसारख्या गंभीर आजारांवर केवळ रुग्णालयाचा खर्च नव्हे, तर कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक संतुलन बिघडवणारा खर्च होतो.
'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित काय आहे?
तुमचा स्टँडर्ड हेल्थ प्लॅन आणि क्रिटिकल इलनेस (गंभीर आजार) कव्हरमध्ये मोठा फरक आहे, जो समजून घेणे आवश्यक आहे:
| निकष | रेग्युलर हेल्थ प्लॅन (बेस प्लॅन) | क्रिटिकल इलनेस कव्हर (रायडर) |
| पेमेंटचा प्रकार | रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेस. खर्च झाल्यावर बिल कंपनी देते. | एकगठ्ठा रक्कम आजाराचे निदान होताच कंपनी पूर्ण रक्कम देते. |
| कशासाठी वापर | केवळ रुग्णालयातील खर्च | कोणत्याही खर्चासाठी वापरण्यास मोकळीक (नोकरी गेल्यामुळे झालेले उत्पन्नाचे नुकसान, घरातील खर्च, कर्जाचे EMI, परदेशात उपचार) |
| आवश्यकता | आजारपणात झालेले बिल भरते. | उत्पन्न थांबल्यास कुटुंबाला आर्थिक आधार देते. |
| निकष | रेग्युलर हेल्थ प्लॅन (बेस प्लॅन) | क्रिटिकल इलनेस कव्हर (रायडर) |
| पेमेंटचा प्रकार | रिइम्बर्समेंट किंवा कॅशलेस. खर्च झाल्यावर बिल कंपनी देते. | एकगठ्ठा रक्कम आजाराचे निदान होताच कंपनी पूर्ण रक्कम देते. |
| कशासाठी वापर | केवळ रुग्णालयातील खर्च | कोणत्याही खर्चासाठी वापरण्यास मोकळीक (नोकरी गेल्यामुळे झालेले उत्पन्नाचे नुकसान, घरातील खर्च, कर्जाचे EMI, परदेशात उपचार) |
| आवश्यकता | आजारपणात झालेले बिल भरते. | उत्पन्न थांबल्यास कुटुंबाला आर्थिक आधार देते. |
एकगठ्ठा रकमेची गरज का?
- रुग्णालयाचा खर्च रेग्युलर पॉलिसी देत असतानाही, क्रिटिकल इलनेस कव्हरमधून मिळणाऱ्या एकगठ्ठा रकमेची (उदा. २० लाख किंवा ५० लाख) गरज खूप मोठी आहे.
- गंभीर आजाराच्या उपचारांदरम्यान व्यक्तीची नोकरी किंवा व्यवसाय पूर्णपणे थांबतो. त्यामुळे घराचे नियमित उत्पन्न बंद होते.
- रेग्युलर पॉलिसी तुम्हाला महागड्या केमोथेरपीचे बिल देईल, पण घरातील किराणा, मुलांची फी किंवा होम लोनचा EMI भरणार नाही.
- क्रिटिकल इलनेस कव्हरमधून मिळालेल्या रकमेचा वापर पॉलिसीधारक आपल्या इच्छेनुसार करू शकतो. यामुळे आर्थिक संकट टळते आणि तो फक्त आरोग्यावर लक्ष केंद्रित करू शकतो.
कोणते गंभीर आजार होतात समाविष्ट?
गंभीर आजार कव्हरचा आवाका मोठा असतो. पॉलिसीनुसार यात फरक असला तरी, अनेक कंपन्या २० ते ३५ प्रमुख आणि जीवघेण्या आजारांविरुद्ध संरक्षण देतात.
- कर्करोग
- हृदयविकाराचा झटका
- स्ट्रोक
- किडनी निकामी
- प्रमुख अवयव प्रत्यारोपण
- पक्षाघात
- कोरोनरी आर्टरी बायपास सर्जरी
हे कव्हरेज तुम्हाला आयुष्याची संपूर्ण बचत काही महिन्यांत संपण्यापासून वाचवते.
पॉलिसी घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या
- वेटिंग पीरियड : पॉलिसी घेतल्यानंतर सामान्यतः ९० दिवसांनंतरच तुम्ही क्लेम करू शकता. आधीपासून असलेल्या आजारांसाठी ही मुदत २ ते ४ वर्षांपर्यंत असू शकते.
- सर्व्हायव्हल पीरियड : अनेक पॉलिसींमध्ये ही अट असते की, आजाराचे निदान झाल्यानंतर पॉलिसीधारकाला एक निश्चित कालावधी (उदा. १४ ते ३० दिवस) जिवंत राहावे लागते, तरच क्लेमची रक्कम मिळते. हा क्लॉज नक्की तपासा.
- कव्हरेज आणि प्रीमियम: आपले वय, जीवनशैली आणि कौटुंबिक आरोग्य इतिहास पाहून योग्य कव्हरेज रक्कम निवडा. केवळ कमी प्रीमियमच्या मागे न लागता पुरेसे कव्हरेज घेणे शहाणपणाचे आहे.
