Health Insurance : इंटरनेटच्या विस्तारामुळे आता घरबसल्या आरोग्य विमा खरेदी करणे अत्यंत सोपे झाले आहे. पारदर्शकता, कागदपत्रांशिवाय होणारी प्रक्रिया आणि विविध योजनांची तुलना करण्याची सोय यामुळे ऑनलाइन विमा खरेदीकडे कल वाढला आहे. मात्र, विमा एजंट नसल्यामुळे अनेकदा तांत्रिक गोष्टी समजून घेताना चुका होतात. या लहान चुकांमुळे आणीबाणीच्या वेळी तुमचा विमा क्लेम नाकारला जाऊ शकतो.
स्वस्त प्रीमियमचा 'सापळा' ओळखा
अनेक ग्राहक केवळ कमी प्रीमियम पाहून पॉलिसी निवडतात. मात्र, स्वस्त प्लॅनमध्ये अनेकदा रूम रेंट कॅपिंग, सब-लिमिट आणि को-पे सारख्या कडक अटी असतात. केवळ कर सवलत मिळवण्यासाठी विमा न घेता, तो कुटुंबाच्या सुरक्षेसाठी एक महत्त्वाचे साधन म्हणून पाहणे गरजेचे आहे.
ऑनलाइन विमा घेताना 'या' गोष्टींची खबरदारी घ्या
१. आजारांची माहिती लपवू नका (सर्वात मोठी चूक) :
प्रपोजल फॉर्म भरताना जुने आजार, शस्त्रक्रिया किंवा सुरू असलेली औषधे यांची माहिती लपवू नका. बहुतेक क्लेम रिजेक्शन हे चुकीच्या किंवा अपुऱ्या माहितीमुळे होतात. प्रामाणिकपणे दिलेली माहिती तुमच्या भविष्यातील क्लेमची हमी असते.
२. रूम रेंट मर्यादा
तुमच्या पॉलिसीमध्ये कोणत्या श्रेणीतील खोली समाविष्ट आहे हे तपासा. जर तुम्ही मर्यादेपेक्षा महागडी खोली निवडली, तर केवळ खोलीचे भाडेच नाही, तर संपूर्ण हॉस्पिटल बिलावर मोठी कपात होऊ शकते.
३. कॅशलेस नेटवर्क
विमा घेण्यापूर्वी तुमच्या शहरातील प्रमुख रुग्णालये त्या कंपनीच्या 'नेटवर्क हॉस्पिटल'मध्ये आहेत का, हे तपासा. कॅशलेस सुविधेमुळे खिशातून पैसे न भरता उपचार घेणे सोपे होते.
४. ओपीडी आणि ॲड-ऑन कव्हर्स
बहुतेक पॉलिसींमध्ये ओपीडी खर्च समाविष्ट नसतो. तुम्हाला गरज असल्यास त्यासाठी वेगळा 'ॲड-ऑन' घ्यावा लागतो. तसेच, टॉप-अप प्लॅन घेताना त्याचा 'डिडक्टिबल' आकडा तुमच्या मूळ पॉलिसीशी जुळतो की नाही, हे तपासा.
५. वेटिंग पिरियड
विमा घेतल्या घेतल्या लगेच सर्व आजारांचे कव्हर मिळत नाही. काही आजारांसाठी २ ते ४ वर्षांचा वेटिंग पिरियड असतो. हा काळ नीट समजून घ्या.
वाचा - निवृत्तीवेळी १ कोटी रुपयांचा फंड हवाय? मग आतापासूनच गुंतवणुकीचे 'हे' नियम फोलो करा
तज्ज्ञांचा सल्ला
जर तुमची शस्त्रक्रिया नियोजित असेल, तर हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या ३ ते ५ दिवस आधीच 'प्री-ऑथोरायझेशन' प्रक्रिया सुरू करा. यामुळे ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल.
