The government will consider the suggestion of deduction of personal income - Nirmala Sitharaman | वैयक्तिक प्राप्तिकरातील कपातीच्या सूचनेवर सरकार विचार करेल - निर्मला सीतारामन
वैयक्तिक प्राप्तिकरातील कपातीच्या सूचनेवर सरकार विचार करेल - निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : वैयक्तिक प्राप्तिकराच्या दरांत कपात करण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तरांच्या तासात केले. टीएमसी सदस्य सौगाता रॉय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सीतारामन यांनी वरील वक्तव्य केले. सरकारने अलीकडेच कॉर्पोरेट करात कपात केली आहे. या पार्श्वभूमीवर वैयक्तिक प्राप्तिकरातही कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे.
त्या अनुषंगाने उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर निर्मला सीतारामन म्हणाल्या की, वैयक्तिक करदात्यांना केंद्र सरकारने वेळोवेळी दिलासा दिला आहे. तसेच कित्येक सूट व सवलतीही वेळोवेळी दिल्या आहेत.
गुंतवणूक वाढावी यासाठी कंपनी कायद्यांतर्गत कॉर्पोरेट करात सवलती सरकारने दिल्या. त्याची तुलना इतरत्र केली जाऊ नये. हे केले, मग ते केले पाहिजे, असे म्हटले जाऊ नये. सरकार वैयक्तिक प्राप्तिकरावर स्वतंत्रपणे गुणवत्तेच्या निकषावर विचार
करण्यात येईल.
सीतारामन यांनी सांगितले की, विकसित देश, विकसनशील देश आणि उगवत्या अर्थव्यवस्था यांच्यातही तुलना करणे अयोग्य आहे. त्यांनी करकपात केली म्हणून
तुम्हीही केली पाहिजे, असे म्हणून चालणार नाही.

आणखी सुधारणा करणार
भारताला गुंतवणुकीचे अधिक आकर्षक ठिकाण बनविण्यासाठी आणखी आर्थिक सुधारणा केल्या जातील, अशी घोषणाही निर्मला सीतारामन यांनी केली. सीतारामन भारत-स्वीडन व्यवसाय शिखर परिषदेत म्हणाल्या की, बँकिंग, खाण आणि विमा यासारख्या विविध क्षेत्रांत आणखी सुधारणा करण्यासाठी भारत बांधील आहे.
सीतारामन यांनी स्वीडिश कंपन्यांना पायाभूत क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी निमंत्रित केले. आगामी पाच वर्षांत पायाभूत क्षेत्रात १00 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची भारताची योजना आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

Web Title: The government will consider the suggestion of deduction of personal income - Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.