Paytm Payments Bank : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) Paytm Payments Bank चा बँकिंग परवाना रद्द केला आहे. या कारवाईनंतर लाखो ग्राहकांमध्ये त्यांचे जमा पैसे परत कधी मिळणार, याबाबत चिंता वाढली आहे. Paytm Payments Bank कडून १० कोटींहून अधिक ग्राहक असल्याचा दावा केला जातो. मात्र, नियामकांच्या कारवाईनंतर बँकेच्या बंद प्रक्रियेला आता गती मिळत आहे.
जाणून घ्या संपूर्ण प्रकरण?
One97 Communications आणि त्याचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी प्रमोट केलेल्या या बँकेवर मार्च २०२२ पासूनच काही निर्बंध लागू होते. जानेवारी २०२४ मध्ये RBI ने नियमांचे पालन न केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आणि नवीन ठेवी (Deposits) स्वीकारण्यावर बंदी घालण्यात आली. यामुळे ग्राहकांमध्ये घबराट वाढली आणि मोठ्या प्रमाणावर पैसे काढण्यास सुरुवात झाली.
ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत का?
RBI ने स्पष्ट केले आहे की, Paytm Payments Bank कडे पुरेशी रक्कम उपलब्ध आहे, ज्यामुळे सर्व ग्राहकांना त्यांची जमा रक्कम परत देणे शक्य आहे. ग्राहकांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा करण्यात आला आहे, ज्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होणार नाही. यामुळेच, रिफंड प्रक्रियेबाबत लवकरच स्पष्ट टाइमलाइन जाहीर होण्याची शक्यता आहे.
बँकेकडून दिलासा
परवाना रद्द झाल्यानंतर Paytm Payments Bank नेही ग्राहकांना आश्वासन दिले की, बँकेकडे पुरेशी कॅश उपलब्ध असून, सर्व ग्राहकांचे पैसे परत केले जातील. दरम्यान, Paytm Payments Bank मध्ये ग्राहकांचे पैसे सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, वॉलेट बॅलन्स, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट्स आणि FASTag च्या स्वरुपात आहेत.
