Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 15:11 IST2019-10-05T15:10:58+5:302019-10-05T15:11:17+5:30
भाजपचे आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारातच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे.

Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिरंगी लढत
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या खामगाव विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
खामगाव या मतदारसंघात भाजप-सेना महायुती, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमध्येच तिहेरी सामना रंगणार असल्याचे शुक्रवारी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जावरून दिसून येते. खामगाव मतदारसंघात शुक्रवारपर्यंत १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये भाजपचे आकाश फुंडकर, काँग्रेसचे ज्ञानेश्वरदादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारातच सामना रंगणार असल्याची चर्चा आहे. स्वाभीमानी शेतकरी संघटनेकडून दाखल उमेदवारी सद्यस्थितीत कायम असली तरी, स्वाभीमानी शेतकरी संघटना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा घटकपक्ष आहे. त्यामुळे येत्या चार-पाच दिवसांत या मतदारसंघातून स्वाभीमानीचे आव्हान संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. वंचित आघाडीकडून दोन उमेदवारांनी एकाचवेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने, वंचितच्या उमेदवारीबाबत काहीशी संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे चित्र आहे. या मतदारसंघातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीच्या एका उमेदवाराने गुरूवारी अर्ज दाखल केल्यानंतर, शुक्रवारी दुसºया एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे या मतदारसंघात वंचित आघाडीच्या उमेदवारीतही अर्ज दाखल होईपर्यंत सस्पेन्स कायम असल्याचे दिसून येते.
एआयएमआयएमचा उमेदवार रिंंगणात नाही?
खामगाव मतदारसंघातून एआयएमआयच्यावतीने एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला पेव फुटले आहे. एआयएमआयची वंचित सोबत युती नसतानाही या मतदारसंघातून एआयएमआयने उमेदवार न दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.