मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 15:15 IST2025-03-13T15:14:02+5:302025-03-13T15:15:24+5:30

Bhandara : उपाययोजनांची गती वाढवा; बंधारा बांधण्याचे काम झाले सुरू

Women are wandering for water in Mohadi; Water shortage due to lack of planning by the administration | मोहाडीत महिलांची पाण्यासाठी होतेय भटकंती; प्रशासनाने नियोजन न केल्याने पाणी टंचाई

Women are wandering for water in Mohadi; Water shortage due to lack of planning by the administration

सिराज शेख 
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी :
नगरपंचायत प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे मोहाडीवासीयांना उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून नळाला दोन दिवसाआड पाणी येत असल्याने महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता मोठी कसरत करावी लागत आहे. मोहाडी शहराला उन्हाळ्यात दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो हे माहीत असतानाही नगर पंचायत प्रशासनाने यासाठी पूर्वीच कोणतेही नियोजन न केल्याने यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाई जाणवू लागली आहे.


नगरपंचायतीतर्फे सूर नदीवर लाखो खर्चुन करून बंधारा बांधून पेंचचे पाणी अडविले जाते. उन्हाळ्यात पाणीटंचाई भासत नाही. पदाधिकारी व अधिकारी यांच्यात असलेल्या समन्वय नसल्याने पेंचचे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा भुर्दंड अप्रत्यक्षपणे जनतेवर बसत असतो. 


बंधारा बांधण्याचे काम झाले सुरू
सात-आठ दिवसांपासून सूर नदीबर पुलाला लागून बंधारा बांधण्याचे कार्य सुरू आहे. बंधारा बांधून झाल्यानंतर पेंच प्रकल्प अधिकाऱ्यांना विनवणी करून व पाण्याचे पैसे भरून पाणी आणले जाईल, तेव्हा कोठे मोहाडीवासीयांना दररोज नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळू शकेल व तेही अशुद्ध पाणी.


पैसे द्या पाणी न्या...
सूर नदीवर जेथे मोहाडी शहराला पाणीपुरवठा करणारा पंप हाऊस आहे, त्या ठिकाणी तीन महिन्यांअगोदरच बंधारा बांधला असता तर शेतकऱ्यांसाठी सोडलेले पाणी नदीत येऊन पाणी अडविण्यात यश आले असते आणि पेंच प्रकल्पाचे पाणी पैसे देऊन घेण्याची वेळ आली नसती. मागील महिन्यापर्यंत सूर नदी पात्रातून पाणी वाहत होते. तेच पाणी जर पूर्वी अडविले गेले असते तर जून महिन्यापर्यंत पेंच प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळाले असते.


पेंचचे पाणी नगरपंचायतीसाठी, लाभ अनेक ग्रामपंचायतींना
मोहाडी नगरपंचायत पाण्याचे पैसे भरून पेंचचे पाणी आणते. परंतु पेंच प्रकल्पापासून मोहाडी पाणीपुरवठा योजनेपर्यंत पाणी पोहोचताना मधात अनेक ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी सूर नदीकाठावर आहेत. त्या ग्रामपंचायती फुकटात या पाण्याचा लाभ घेतात. एवढेच नाही तर नदीत ठिकठिकाणी असलेल्या खड्यात हे पाणी साचून राहते व त्याचा फायदा जनावरांनासुद्धा होतो. परंतु या पाण्याच्या भुर्दंड नगरपंचायत भरत असते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाणीटंचाई विषयाखाली पेंचच्या पाण्याचा कोणताही पैसा न देता पेंच प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी आणि नगरसेवकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Web Title: Women are wandering for water in Mohadi; Water shortage due to lack of planning by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.