दुरवस्थेतील जिल्हा क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार काय ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 11:36 IST2024-08-29T11:35:45+5:302024-08-29T11:36:22+5:30
Bhandara : छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था

Will the face of the dilapidated district sports complex change?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा मुख्यालयातील एकमेव असलेल्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाची दुरवस्था आहे. बऱ्याच प्रयत्नांती या क्रीडा संकुलाचे रुपडे पालटणार असल्याची माहिती असली तरी अजूनपर्यंत याची कामे सुरू झालेली नाहीत. या क्रीडा संकुलात सुविधा निर्माण झाल्यास भविष्यात येथूनही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू बाहेर पडतील, अशी आशा आहे.
दरवर्षी २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलांची स्थितीवर नजर घातल्यास त्यात बऱ्याच अडचणी दिसून येतात. जिल्हा क्रीडा संकुलात धावण्याच्या ट्रॅकसह अन्य सोयी सुविधांचा अभाव आहे. उल्लेखनीय म्हणजे या जिल्हा क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ७० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यापैकी १५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध खेळांसह उत्कृष्ट क्रीडापटूंचाही सत्कार करण्यात येत असतो. ही परंपरा या वर्षीही कायम आहे.
जादूगिरी करणारे खेळाडू तयार व्हावेत
"राष्ट्रीय क्रीडा दिन हा मेजर ध्यानचंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा केला जातो. त्यामुळे या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जादूगिरी करणारे खेळाडू निर्माण व्हावे, अशी आमची इच्छा आहे. त्या दर्जाचे हे क्रीडा संकुल निर्माण होणे अपेक्षित आहे."
-राजेंद्र भांडारकर, मुख्य मार्गदर्शक वॉटर स्पोर्ट अकॅडमी भंडारा (कारधा
उच्च दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावेत
"जिल्हा क्रीडा संकुलात विकासाला मोठा वाव आहे. येथे भरीव निधीस मिळाल्यास उच्च सुविधा निर्माण करून त्या खेळाडूंना उपलब्ध होऊ शकतील. तेथूनच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडापटू निर्माण होण्यास मदत होईल"
- प्रणाली रामटेके, वेटलिफ्टिंग स्पर्धक भंडारा.
"जिल्ह्याने आतापर्यंत अनेक शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू दिले आहेत. येणाऱ्या दिवसात पंधरा कोटी रुपये खर्च करून या क्रीडा संकुलात सिंथेटिक ट्रॅक आणि फुटबॉल करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू भंडाऱ्यात घडवावे, असा आमचा मानस आहे. पटू व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे."
- लतिका लेकुरवाडे, जिल्हा क्रीडाधिकारी, भंडारा.