३१ मार्चपूर्वी धान उत्पादकांना बोनसचा लाभ मिळणार का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:33 IST2025-03-28T12:32:48+5:302025-03-28T12:33:37+5:30
Bhandara : जिल्ह्यात १.६५ लाखावर धान उत्पादकांची वाढली अपेक्षा

Will paddy producers get bonus benefits before March 31?
लोकमत न्यूज नेटवर्क
आंधळगाव : खरीप हंगाम २०२४ करिता जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये पणन विभागामार्फत २३६ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या धान खरेदी केंद्रांच्या माध्यमातून १ लाख ६५ हजार ६६४ शेतकऱ्यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केली आहे. या शेतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळणार असला तरी तो ३१ मार्चच्या पूर्वी मिळणार का, हा मात्र प्रश्न आहे.
भंडारा हा धान उत्पादकांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात सातही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर धान शेती केली जाते. आधारभूत धान खरेदी केंद्रावर नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी २० हजार रुपये बोनस मिळणार आहे. यासंबंधीचा शासन निर्णय झाला असून लवकरच बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर ए ग्रेडला २,३२० रुपये तर सर्वसाधारण ग्रेडला २,३०० रुपयांचा हमीभाव शासनाकडून जाहीर करण्यात आला आहे. याच हमीभावात शेतकऱ्याला आपले धान विकावे लागते. परंतु मिळालेल्या हमीभावात शेतकऱ्यांना धान शेती परवडत नाही. त्यामुळे मागील चार वर्षापासून शासनाकडून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन स्वरूपात बोनस दिला जातो. सुरुवातीला ही रक्कम क्विंटल मागे देण्यात येत होती परंतु मागील वर्षीपासून शासनाने यात बदल करून सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना हेक्टर मागे बोनस देण्यात येते.
हंगाम २०२४ करिता नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याची घोषणा केली. बराच काळ उलटून सुद्धा शासन निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांना बोनस मिळणार की नाही याबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. अखेर २५ मार्चला बोनस मिळण्यासंबंधीच्या शासन निर्णय झाला असून त्यावर शिक्कामार्फत करण्यात आला आहे.
पिक कर्ज भरण्याच्या कामी येईल का बोनस ?
पीक कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे. ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्यासाठी शेवटची मुदत आहे. त्यासाठी शेतकरी धावपळ करत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी बोनसची रक्कम ही पीक कर्ज भरण्यासाठी त्यांच्या उपयोगी पडणार का, असा सवाल शेतकरी करीत आहेत.