तुमसर रोड अमृत भारत रेल्वे स्थानकाचा कायापालट कधी होणार ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 11:49 IST2024-12-05T11:48:23+5:302024-12-05T11:49:52+5:30
Bhandara : रेल्वे प्रशासनाचे मौन एकाच कंत्राटदाराला चार ते पाच रेल्वे स्थानकाचे काम

When will Tumsar Road Amrit Bharat Railway Station be transformed?
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : रेल्वे मंत्रालयाने पहिल्या टप्प्यात मुंबई-हावडा या प्रमुख रेल्वे मार्गावर तुमसर रोड रेल्वे स्थानकाची निवड अमृत महाराज रेल्वेस्थानकात केली होती. मागील दीड वर्षापासून येथे कासवगतीने या रेल्वे स्थानकात कामे सुरू आहेत. एकाच कंत्राटदाराला चार ते पाच रेल्वे स्थानकाचे कामे अमृत भारत योजनेअंतर्गत मिळाली असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कामांची गती येथे अगदी कमी आहे. त्याचा फटका सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना बसत आहे.
नागपूर विभागात तुमसर रोड रेल्वे जंक्शन हे क्रमांक तीनचे मोठे रेल्वे जंक्शन आहे. रेल्वे मंत्रालयाने तुमसर रोड रेल्वे स्थानकाच्या समावेश अमृत भारत रेल्वे स्थानकात केला आहे.या योजनेअंतर्गत हे रेल्वे स्टेशन कात टाकून अत्याधुनिक सोयीसुविधा रेल्वे प्रवाशांना मिळणार आहेत. परंतु, कामाची गती पाहता पुन्हा याला किमान आठ ते बारा महिने लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशात पहिल्या टप्प्यात १३३७ रेल्वे स्थानकाच्या कायापालट होणार असून, अनेक रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व सौंदर्गीकरण झाले आहे. याकरिता रेल्वे मंत्रालयाने १२.३९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. तुमसर रोड रेल्वे स्थानकात पार्किंग, तसेच आकर्षक प्रवेशद्वार व निकासी द्वार असे दोन द्वार राहणार असून, आधुनिक तिकीट काउंटर, प्रतीक्षालय, अत्याधुनिक शौचालय, दिव्यांगांकरिता वेगळे तिकीट काउंटर, सीसीटीव्ही कॅमेरे, हायमास्ट लाईट, आदींचा समावेश राहणार आहे. परिणामी बांधकामाला अजून वेळ लागेल.
रेल्वे स्थानकाची कामे कासवगतीने
तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयांना घेतला. या रेल्वे स्थानकातून किमान अडीच ते तीन हजार प्रवासी दररोज प्रवास करतात. अमृत भारत रेल्वे स्थानकाचे काम निश्चित वेळेत पूर्ण करण्याचे वेळेचे बंधन रेल्वे मंत्रालयाने घालून दिले होते. दीड वर्षानंतरही येथे कामे पूर्ण झाली नाही तर कामांची गती अतिशय मंद आहे. येथील काम करणारे कंत्राटदारांनी पुन्हा चार ते पाच रेल्वे स्थानकांची कामे घेतली असल्याची माहिती सूत्राने दिली.
सांस्कृतिक झलक विशेष आकर्षण
भंडारा जिल्ह्यातील तुमसर रोड हे महत्त्वपूर्ण रेल्वे जंक्शन असून, तुमसर हे तांदळाकरिता भारतात प्रसिद्ध आहे. येथे विशेष कलाकृतींचे रेल्वे स्थानकात आकर्षक राहणार असून, स्थानिक सांस्कृतिक झलक या रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर राहणार आहे. त्यामुळे तुमसर रेल्वे स्थानकाचे लुकच बदलणार असल्याचे सांगण्यात आले.