नेरला उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम केव्हा सुरु करणार ? १५ दिवसांच्या आत सुरु न झाल्यास उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:26 IST2025-01-20T15:23:22+5:302025-01-20T15:26:50+5:30

अधिकाऱ्यांना निवेदन : किसान सहकारी पाणीवापर संस्थेची मागणी

When will the stalled work of Nerla Upsa Irrigation Scheme be started? If it is not started within 15 days, hunger strike will be launched. | नेरला उपसा सिंचन योजनेचे रखडलेले काम केव्हा सुरु करणार ? १५ दिवसांच्या आत सुरु न झाल्यास उपोषण

When will the stalled work of Nerla Upsa Irrigation Scheme be started? If it is not started within 15 days, hunger strike will be launched.

लोकमत न्यूज नेटवर्क 
किटाडी :
गोसेखुर्द पाटबंधारे विभागाच्या वतीने नेरला उपसा सिंचन योजना विभाग आंबाडी अंतर्गत जलसाठ्याच्या आधारावर कोरडवाहू क्षेत्रात उन्हाळी धान पिकासाठी सिंचनाची सुविधा करण्यात आली. मात्र, लाखनी तालुक्यातील किटाडी क्षेत्रात शिवारातील शेतकऱ्यांना अद्यापही कोणतीही सिंचनाची सुविधा उपलब्ध केली गेली नाही.


परिणामी, कोरडवाहू क्षेत्रातील शेतकरी सिंचन सुविधांपासून वंचित आहेत. याबाबत किटाडी येथील किसान सहकारी पाणीवापर संस्था व शेतकऱ्यांच्या वतीने पाइपलाइनचे रखडलेले काम पूर्ण करण्याची एकमुखी मागणी संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आलेली आहे. किटाडी शिवारातून गावालगतच्या बाजूने २०२१ मध्ये भूमिगत नहर पाइपलाइन गेलेली आहे. मात्र, आता तीन वर्षांचा कालावधी लोटूनही ती पाइपलाइन अद्यापपर्यंत अपूर्ण अवस्थेत असून, काम रखडलेले आहे.


नेरला उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून किटाडी व परिसरातील अंदाजे जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचन होणे अपेक्षित आहे. धरणाचे पाणी शेतीला मिळण्यासाठी शेतकरी आतुर आहेत. पाइपलाइनची कामे पूर्णत्वास गेल्यास शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.


उपोषणाचा इशारा 
रखडलेले भूमिगत पाइपलाइनचे काम पूर्ण करण्याच्या अनुषंगाने यापूर्वी किटाडी येथील पदाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला पत्राद्वारे कळविले आहे. शेतकऱ्यांना पुढे उन्हाळी धान पिकाचे उत्पादन घेणे सोयीचे होईल, कामाला १५ दिवसांत सुरुवात करावी, अन्यथा उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष ईश्वर चौधरी, सुकराम भोयर, सचिव लेकराम चौधरी यांनी दिला आहे.


"रखडलेले काम कंत्राटदाराने पूर्ण न केल्यामुळे संबंधित कंत्राटदारावर दंड आकारण्यात आला आहे. या कामाला गती मिळण्याच्या अनुषंगाने पुढील आठवड्यात वरिष्ठ स्तरावर आढावा बैठक घेण्यात येईल." 
- एस. आर. भुरे, उपविभागीय अभियंता,

Web Title: When will the stalled work of Nerla Upsa Irrigation Scheme be started? If it is not started within 15 days, hunger strike will be launched.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.