अमृत भारत रेल्वेचे स्वप्न केव्हा पूर्ण होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 16:11 IST2025-05-12T16:11:10+5:302025-05-12T16:11:36+5:30
Bhandara : तुमसर रेल्वे स्थानकामधील सुरू असलेली विकासात्मक कामे मागील दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू

When will the dream of Amrut Bharat Railway be fulfilled?
मोहन भोयर
तुमसर : भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना जागतिक स्तरावरील जागतिक सेवा सुविधा देण्याच्या दावा करते. तुमसर रोड रेल्वे स्थानकाचा समावेश अमृतभारत रेल्वे स्थानकात करण्यात आला आहे. केवळ आठ कोटी निधीची कामे करण्याकरिता दोन वर्षांपेक्षा अधिक काळ येथे लागला असून, अजूनही कामे पूर्ण झाली नाहीत. अत्यंत कासवगतीने येथे कामे सुरू आहेत. रेल्वे स्थानकाची विकास कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. याबाबत कुणीच दखल घेताना दिसत नाही.
रेल्वेचा प्रवास हा स्वस्त, जलद व सुरक्षित मानला जातो. रेल्वेला लाइफलाइनही म्हटले जाते. मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरील तुमसर रोड रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण जंक्शन आहे. रेल्वे मंत्रालयाने पहिल्या टप्प्यामध्ये या रेल्वे स्थानकाच्या समावेश अमृतभारत रेल्वे स्थानकात केला आहे.
दररोज एक लाख रुपयाचा महसूल हा रेल्वे स्थानक मिळवून देतो. नागपूर विभागात तिसऱ्या क्रमांकाचे तुमसर रेल्वे स्थानक आहे. पहिल्या टप्प्यात समावेश असूनही या रेल्वे स्थानकामधील सुरू असलेली विकासात्मक कामे मागील दोन वर्षांपासून कासव गतीने सुरू आहेत. पूर्ण कामे केव्हा होतील, याबाबत कुणीच सांगायला तयार नाही.
लोकप्रतिनिधींची भेट
रेल्वे स्थानकाला लोकप्रतिनिधींनी यापूर्वी भेटी देत कामांची माहिती घेतली. कामेही समाधानकारक सुरू नसल्याच्या शेराही त्यांनी दिला. परंतु, त्याकडेही रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याच्या दिसून येते. रेल्वेची कामे ही वेळेत व गुणवत्तापूर्ण होतात अशी आजपर्यंत समजूत होती, परंतु येथे सातत्याने कामे रखडल्यामुळे रेल्वेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
अधिकाऱ्यांचे निरीक्षण
नागपूर येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून नियमित तपासणी व निरीक्षण केले जाते, तसेच गतिशक्ती या विभागांचे येथे या विकासात्मक कामावर प्रत्यक्ष नियंत्रण आहे. परंतु अजून पर्यंत येथील विकासात्मक कामे पूर्णत्वास का आली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. यावर रेलवे प्रशासनाने तत्परता दाखविणे महत्वाचे आहे.
आठ कोटींचा निधी मंजूर
केंद्र शासनाने अमृतभारत रेल्वे स्थानकाकरिता येथे आठ कोटींच्या निधी मंजूर केला आहे. त्यात मुख्य प्रवेशद्वार तसेच रेल्वे स्थानकातून बाहेर निघण्यासाठी एक्झिट अशी दोन द्वारे येथे आहेत. त्यांची ही कामे येथे अजुनही पूर्णत्वास आलेली नाहीत. रेल्वे स्थानकात एक्सलेटर इत्यादी अत्याधुनिक सोयी-सुविधा अजूनपर्यंत सुरुवात झाली नाही. रेल्वे प्रवासाकरिता येथे प्रतीक्षालयाची कामे सुरूच आहेत. रेल्वे फलाटातील शेडची कामेही अपूर्ण आहेत. एकंदरीत येथे अजूनपर्यंत केवळ ६० टक्केच कामे पूर्ण झाल्याचे दिसून येत आहेत.