बाळाच्या जन्मापूर्वी आईने कोणत्या तपासण्या करणे आवश्यक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:16 IST2025-04-04T15:16:03+5:302025-04-04T15:16:37+5:30

Bhandara : ८ तपासण्या गर्भधारणा झाल्यानंतर प्रसुतीपर्यंत होणे गरजेच्या

What tests should a mother undergo before giving birth? | बाळाच्या जन्मापूर्वी आईने कोणत्या तपासण्या करणे आवश्यक?

What tests should a mother undergo before giving birth?

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांत गरोदर मातांची नोंदणी नियमित सुरू असते. आरसीएच पोर्टलवर नोंदणी मोफत असून, कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. मातांनी आपल्या नजीकच्या कोणत्याही सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन ही नोंदणी करता येते. सर्व तपासण्या व औषधोपचार निःशुल्क आहेत.


ग्रामीण भागात अद्यापही गर्भवतींना पुरेशा आरोग्याच्या सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने गर्भवती आणि बाळाच्या स्वास्थ्यासाठी आरसीएच (प्रजनन आणि बालआरोग्य) पोर्टलची संकल्पना मांडली आहे. या पोर्टलवर माता व बालस्वास्थ्याशी संबंधित महत्त्वपूर्ण सेवा पुरविल्या जातात. बाळ होण्याची 'गुड न्यूज' समजताच गरोदर मातेने तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधून आरसीएच पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. आरसीएच पोर्टमध्ये गर्भवती महिलांच्या तपासणीपासून ते नवजात बाळाच्या लसीकरणापर्यंत सर्व माहिती डिजिटल स्वरूपात नोंदविली जाते.


नोंदणीनंतर महिलांना आरसीएच नंबर मिळतो. सकस आहार, आरोग्य तपासणी, प्रधानमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना, जननी सुरक्षा योजना व इतर आरोग्य विभागाच्या योजनेचा लाभउपलब्ध करून दिला जातो. या नोंदणीनंतरच महिलांना राज्य सरकार व केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळतो. 


माता मृत्यूची कारणे काय ?
ग्रामीण भागातून उशिरा रेफर करणे, प्राथमिक उपचार न करता रेफर करणे, प्रसूतीदरम्यान अतिरक्तस्राव, झटके येणे यामुळे मृत्यू होऊ शकतो.
वेदना मातेच्या लक्षात न येणे, प्रसुतीकळा, वेळीच रुग्णालयात न पोहोचणे, रुग्णालयात आल्यानंतर वेळीच उपचार न मिळणे.
अतिरक्तदाब, कावीळ, किडनीवर परिणाम, प्रसुतीसाठी वेळेवर वाहन उपलब्ध न होणे ही काही कारणे मृत्यू ओढावून घेतात.


गर्भधारणेनंतर कधी आणि किती वेळा करावी तपासणी?
गर्भधारणेनंतर प्रसुतीपर्यंत किमान ८ तपासण्या होणे महत्त्वाच्या ठरतात, असे प्रसुतीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामध्ये पहिल्या तीन महिन्यांत एकदा, नंतरच्या तीन महिन्यांत तीन आणि शेवटच्या तीन महिन्यांत चार तपासण्या करणे गरजेचे असते. यामुळे बाळाच्या हालचाली तसेच विविध आजार यासंबंधी माहिती मिळण्यास व उपचार होण्यास मदत मिळते.


आरसीएच नोंदणी गरजेची?
आरसीएच नोंदणीत गर्भवतींची सविस्तर आरोग्य नोंद ठेवता येते. गर्भावस्थेदरम्यान नियमित तपासणीची आठवण राहते. डॉक्टर बदलले, कर्मचारी बदलले तरी कोणते उपचार सुरू होते, याची सविस्तर माहिती डॉक्टरांना त्यातून समजते.


आरसीएच म्हणजे गर्भवतींची हेल्थ कुंडली
आरसीएच पोर्टल ही गरोदर महिलांसाठी हेल्थ आरोग्य कुंडली आहे. त्यामध्ये गर्भवतींचे वय, वजन, रक्तदाब, हिमोग्लोबीन, तपासणीचे अहवाल आणि प्रसूतीच्या तारखेची नोंद केली जाते. या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाकडून आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ मिळणे सुलभ होते. 


बाळ होऊ देण्याचे योग्य वय
२१ ते ३० वर्षे या वयात पहिले मूल होणे योग्य असते म्हणजे या वयात आई होणे अधिक सुरक्षित असते. वयाच्या चाळीशीनंतर मूल होण्याचा आईबरोबर शिशूलाही थोका होऊ शकतो. प्रसूतीपूर्व तपासणी नियमितपणे केली पाहिजे.


"आरसीएच पोर्टलचा वापर माता व बाळाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आवश्यक आहे. या पोर्टलच्या माध्यमातून आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभसंबंधितांना घेता येतो."
- डॉ. मिलिंद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा.


"योग्य काळजी घेतली तर माता मृत्यू टळू शकतात. जिल्ह्यात सुविधांमुळे माता मृत्यूंत कमालीची घट झालौ आहे. गरोदरपणात किमान ८ तपासण्या केल्या पाहिजेत. त्यामुळे प्रसुतीवेळी धोका टळतो."
- डॉ. दीप्ती डोकरीमारे, प्रसूतीतज्ज्ञ
 

Web Title: What tests should a mother undergo before giving birth?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.