इतर राज्यातही कार चालवायची? मग 'बीएच' सिरीज घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 11:58 IST2024-09-06T11:58:11+5:302024-09-06T11:58:38+5:30
Bhandara : अन्य राज्यांत बदली होणाऱ्यांना फायदा

Want to drive a car in other states too? Then take the 'BH' series!
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आता वाहन नोंदणीची बीएच सिरीज सुरू करण्यात आली आहे. यामुळे राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. भंडारा जिल्ह्यात दोन वर्षांपासून ही सिरीज सुरू झाली आहे, या अंतर्गत आता वाहनांची नोंदणीही सुरू झाली आहे.
वाहनांचे राज्यांदरम्यान स्थलांतरण सुलभतेने व्हावे, यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २६ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, आता चारचाकी वाहनांच्या नोंदणीकरिता भारत मालिका (बीएच सिरीज) ही नवी नोंदणी मालिका सुरू केली आहे. नव्या 'बीएच' सिरीजचा सर्वाधिक फायदा हा केंद्रीय कर्मचारी तसेच राज्य शासनाच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.
तसेच ज्या व्यक्तींची सातत्याने परराज्यात बदली होते, अशा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी देखील ही सिरीज महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे चारचाकी वाहन चालकांना नंबर बदलविण्याचे कटकट संपणार आहे .
बीएच सिरीजसाठी कोण करु शकतो अर्ज?
- वाहन चालकांना बीएच सिरीज हवी असल्यास त्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असावा. जर तुम्ही दोन वर्षांचा रोड टॅक्स भरलेला असेल तर तुम्हीही बीएच सिरीज घेऊ शकता.
- बीएच सिरीजसाठी परिवहन मंत्रालयाच्या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.
- वाहन डीलरच्या मदतीने देखील नोंदणी करू शकतो. नोंदणी करताना विचारण्यात आलेले सर्व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करणे तेवढेच आवश्यक आहे.
असे असणार नंबर
नवीन सिरीजची सुरुवात बीएच या अक्षराने सुरु होईल. त्याआधी रजिस्ट्रेशन वर्ष असेल. उदाहरणार्थ, २०२१ मधील २१ अंक तिथे असेल, बीएच हा भारत सिरीज कोड आहे. त्यानंतर ४ अंकी क्रमांक राहील. शेवटी राज्याचे शब्द राहतील.
दोन वर्षांपर्यंत रोड टॅक्स भरता येणार
- आता बीएच सिरीजसाठी दर दोन वर्षांनी रोड टॅक्स भरावा लागणार आहे. वाहनाची नोंदणी डीलरकडेच होईल. त्यामुळे त्यांच्याकडेच हा टॅक्स भरावा लागतो. नोंदणी झाल्याशिवाय वाहन रस्त्यावर येऊ शकत नाही.
- देशात बीएच सिरीज दोन-तीन वर्षापासून सुरू आहे. भंडारा जिल्ह्यात बीएच सिरीज प्रणाली सुरू झाली आहे. या बीएच सिरीजची मागणी भंडारा जिल्ह्यात मात्र फारसी दिसत नाही.
- मागील दोन-तीन वर्षांपासून ही सेवा सुरू झाली आहे. आतापर्यंत शेकडो वाहनांना बीएच सिरीज क्रमांक देण्यात आला आहे.
- जिल्ह्यात चारचाकी वाहनांची खरेदी होत असते. परंतु, मोठ्या शहराच्या तुलनेत मागणी कमी होत आहे.
"भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत अनेक वाहनांची नोंदणी या बीएच सिरीज अंतर्गत झाली आहे. बीएच सिरीजचे वाहन संपूर्ण देशात जाऊ शकते. त्यासाठी संबंधित संस्था, कंपनी यांचे दोन राज्यांमध्ये किमान चार कार्यालये किंवा आस्थापना असणे आवश्यक आहे."
- राजेंद्र वर्मा, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, भंडारा,