तुमसर तालुक्यातील आदिवासीबहुल गावांसाठी बसगाड्यांची प्रतीक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:59 IST2025-01-15T13:54:59+5:302025-01-15T13:59:00+5:30
प्रवाशांना फटका : रविवारी एक तास उशिरा सोडली बस, प्रवाशांना सहन करावी लागली गैरसोय

Waiting for buses for tribal-dominated villages in Tumsar taluka!
मोहन भोयर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : 'प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीदवाक्य एसटी महामंडळाचे आहे. परंतु, तुमसर येथे मुख्य मार्गावर नियमित व वेळेवर बसगाड्या सोडण्यात येतात. परंतु, आदिवासीबहुल गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना बसगाडीची प्रतीक्षा करावी लागते. रविवारी लेंडेझरीकडे जाणारी बसगाडी सुमारे एक तास उशिरा सोडण्यात आली. तुमसर बसस्थानकात यावेळी प्रचंड गर्दी झाली होती.
मागील दिवाळीपासून हे खोदकाम तसेच आहे. कासवगतीने सुरू असलेल्या कामांचा फटका प्रवाशांना बसत आहे. या आगारातून शहराकडे बसगाड्या सोडण्याचे प्रमाण अधिक आहे. रविवारी या बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होते. आदिवासी परिसरात जाणाऱ्या लेंडेझरी मार्गावरील मोठ्या प्रमाणात प्रवासी बसस्थानकात बसगाडीची प्रतीक्षा करीत होते. दुपारी एक वाजता ही बसगाडी सुटायला पाहिजे होती, ती एक तास उशिरा म्हणजे दुपारी दोन वाजता सोडण्यात आली.
विकासकामे संथगतीने
तुमसर बसस्थानकात दर्शनी भागात खोदकाम करून ठेवण्यात आलेले आहे. येथे विकासकामे सुरू आहेत. दिवाळीपूर्वी हे खोदकाम करून ठेवण्यात आले होते. परंतु, अजूनपर्यंत ते पूर्ण झाले नाही. मोठ्या संख्येने प्रवासी हे लहानशा जागेमध्ये बसगाड्यांची प्रतीक्षा करीत असतात. विकासकामे का रखडली अथवा कामे संथगतीने येथे का सुरू आहेत.
करण्यात येतो दुजाभाव !
शहराकडे धावणाऱ्या नियमित बसगाड्या येथे सोडण्यात येतात. परंतु, आदिवासीबहुल गावाकडे मात्र उशिरा बसगाड्या सोडण्यात येतात. शहर व ग्रामीण असा दुजाभाव येथे करण्यात येतो, असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक उईके यांनी लावला आहे. प्रवासी मुख्य मार्गावर उतरून जंगल मार्गाने गावाकडे प्रस्थान करतात. वन्यप्राण्यांच्या धोका येथे अधिक असल्याने बसगाड्या वेळेवर सोडण्याची गरज आहे.
मार्गांवर पर्याप्त बस सोडण्याची मागणी
- तुमसर तालुक्यातील लेंडेझरी परिसर आदिवासी बहूल आहे.
- जंगलव्याप्त भागात तुमसर आगारातून सुटणाऱ्या बसेसचे प्रमाणात अत्यल्प आहे.
- प्रवासी व शाळकरी विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय.
"रविवारी ही बस सुमारे एक तास उशिरा सोडण्यात आली. उलट शहराकडे वेळेत बसगाड्या सोडण्यात येत होत्या. स्थानिक एसटीच्या अधिकाऱ्यांना याबाबत सांगितल्यानंतर दुपारी एक तास म्हणजेच दोन वाजता लेंडेझरी ही बस सोडण्यात आली. त्याचा फटका मलासुद्धा बसला."
- अशोक उईके, माजी जिल्हा परिषद सदस्य, तुमसर