तुमसरमध्ये व्होडाफोनच्या खोदकामामुळे जलवाहिनी फोडली; पाणीपुरवठा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 14:34 IST2025-08-07T14:30:28+5:302025-08-07T14:34:49+5:30
अनधिकृत खोदकामाचे गंभीर परिणाम : सात दिवसांत दंड नाही भरला तर कायदेशीर कारवाई

Vodafone's excavation in Tumsar causes water pipeline to burst; water supply disrupted
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : एका मोबाइल कंपनीने नगरपरिषदेची परवानगी न घेता अनधिकृतपणे खोदकाम केले. या खोदकामादरम्यान दोनदिवसांपूर्वी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फोडली गेली. परिणामतः परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या प्रकारामुळे नगरपरिषद प्रशासनाने कंपनीवर ५ लाख रुपयांचा दंड ठोकला असून त्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.
शहरातून भूमिगत केबल टाकण्यासाठी संबंधित व्होडाफोन कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. हे काम करण्यापूर्वी नगरपालिकेची परवानगी घेऊन तांत्रिक मंजुरीही घेणे अपेक्षित होते. मात्र, कंपनीच्या कंत्राटदाराने खोदकाम सुरू केले. यात जलवाहिनी फुटली. यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले व शहराचा पाणीपुरवठा ठप्प पडला.
नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेतली. कंपनीवर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. सात दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरण्याचा अल्टिमेटम देण्यात आला असून विलंब झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सध्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नागरिकांना लवकरच नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न नगरपरिषद प्रशासनाकडून सुरू असल्याने नगर पालिकेकडून सांगण्यात येत आहे. या प्रकारानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली. कंपनीच्या प्रतिनिधींनी नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून समेटाचा प्रयत्न सुरू केला. मात्र नगरपरिषदेने दंडाची रक्कम भरणे अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. यावर संबंधित कंपनी काय भूमिका घेणार हे आता महत्वाचे आहे.