युरियाचा तुटवडा : 'लिंकिंग'च्या बेकायदेशीर अटींमुळे शोषण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 16:34 IST2025-07-29T16:33:58+5:302025-07-29T16:34:40+5:30
शेतकऱ्यांच्या वाढल्या अडचणी : युरिया मिळविण्यासाठी होतोय भटकंती

Urea shortage: Exploitation due to illegal conditions of 'linking'
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामाच्या तोंडावर युरिया खताच्या टंचाईने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. धान लागवडीसाठी अत्यावश्यक असणारे युरिया मिळविण्यासाठी शेतकरी एक दुकान सोडून दुसऱ्या दुकानात धाव घेत आहेत. मात्र, बहुतेक ठिकाणी विक्रेते 'युरिया हवा असेल, तर डीएपी, एनपीके किंवा सूक्ष्म खतेही' घ्या अशी बेकायदेशीर अट घालत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनावश्यक खर्च व आर्थिक शोषणाला सामोरे जावे लागत आहे.
शासकीय दरात २६६ रुपयांना मिळणारी युरिया खताची बॅग आता टंचाईमुळे अनेक ठिकाणी ३०० ते ४०० रुपयांना विकली जात असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. त्यातच लिंकिंगच्या या बेकायदेशीर पद्धतीमुळे शेतकऱ्यांना गरज नसलेल्या इतर खतांची जबरदस्तीने खरेदी करावी लागत आहे.
पिकांची वाढ, उत्पादनावर परिणामाची शक्यता
युरियाच्या तुटवड्यामुळे धान रोवणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात अडचणी वाढल्या आहेत. खत वेळेवर न मिळाल्यास धान पिकाची वाढ खुंटण्याची व उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे..
कडक तपासणी व कठोर कारवाईची अभाव
खत नियमन आदेश, १९८५ प्रमाणे कोणतीही दुकान किंवा विक्रेता खतांसोबत दुसरे खत विकायला भाग पाडू शकत नाही. मात्र, प्रत्यक्षात कृषी विभागाकडून कडक तपासणी अथवा कारवाई होत नाही, असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. कठोर कारवाईची मागणी होत आहे.
तक्रार करण्यास कुणीही समोर येईनात
- अनेकदा शेतकऱ्यांकडून तालुका गुणनियंत्रण निरीक्षकांकडे खत व लिकिंगसंबंधी तोंडी तक्रारी केल्या जातात. परंतु, लिखित तक्रारी करण्यास शेतकरी धजावत नाही. तसेच लिंकिंग होत असल्याची ओरड दुकानदारांकडून नेहमी केली जाते.
- मात्र, कंपन्यांविरोधात तक्रार करण्याचे धाडस दुकानदार दाखविताना दिसत नाही. त्यामुळे तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांच्या कारवायांना अडचणी येतात.
- शेतकऱ्यांनी न घाबरता गैरप्रकार तर करणाऱ्या दुकानदाराविरोधात, दुकानदारांनी लिंकिंगसाठी दबाव टाकणाऱ्या खत कंपन्यांविरुद्ध उभे ठाकले पाहिजे, तरच समस्या संपतील.
२६६₹ ची युरियाची बॅग विकली जात आहे ३०० रुपयांना
जिल्ह्यात चार कृषी केंद्रांवर १० ते ३० दिवसांसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून परवाने निलंबनाच्या कारवाया झाल्यात. परंतु, लिंकिंगची समस्या कायम आहेत.
"जिल्ह्यात युरिया खताच्या टंचाईवर मात करण्यासाठी यापूर्वीच बफर स्टॉक खुला केला आहे. लवकरच युरिया खताच्या दोन रॅक जिल्ह्यात उतरणार आहेत. गरज पडल्यास पुन्हा उर्वरित बफर स्टॉक खुला केला जाईल."
- किशोर पात्रीकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.