हृदयद्रावक! पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2022 13:18 IST2022-12-03T13:08:55+5:302022-12-03T13:18:49+5:30

कुटुंबावर कोसळले आभाळ

Unfortunate death of a one and a half year old girl after falling into a water tank | हृदयद्रावक! पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील घटना

हृदयद्रावक! पाण्याच्या टाकीत पडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, लाखांदूर तालुक्यातील घटना

दयाल भोवते

लाखांदूर (भंडारा) : अंगणात असलेल्या पाण्याच्या टाक्यात पडून दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील सरांडी बुज. येथे शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास घडली. सान्वी छत्रपाल कुथे (दीड वर्ष) असे मृत बालिकेचे नाव आहे.

शनिवारी सकाळी सान्वी  लहान बालकांसोबत अंगणात खेळत होती. मुलगी खेळत असल्याने आई घरकामात व्यस्त होती. काही वेळात घरकाम आटोपल्यानंतर बघितले तर सान्वी अंगणात दिसली नाही. शेजारी जाऊन विचारणा केली. मात्र सान्वी दिसली नाही. परिसरात शोधाशोध करण्यात आली. दरम्यान अंगणात असलेल्या पाण्याच्या टाकीत सान्वी पडलेली दिसली. 

सान्वीला तत्काळ पाण्याबाहेर काढून सरांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून तिला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र ग्रामीण रुग्णालयात नेत असतानाच वाटेत सान्वीचा मृत्यू झाला. या घटनेने कुटुंबावर शोककळा पसरली असून सरांडी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Web Title: Unfortunate death of a one and a half year old girl after falling into a water tank