अवकाळीपावसामुळे वीज पडून दोघांचा मृत्यू, गहू पिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 15:09 IST2025-04-04T15:08:57+5:302025-04-04T15:09:25+5:30

Bhandara : जनजीवन विस्कळीत; विजेचे दोन बळी, जिल्ह्यात दिवसभर रिमझिम, आला पावसाळ्याचा फिल

Two killed in lightning strike due to unseasonal rains, wheat crop damaged | अवकाळीपावसामुळे वीज पडून दोघांचा मृत्यू, गहू पिकाचे नुकसान

Two killed in lightning strike due to unseasonal rains, wheat crop damaged

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर, भंडारा जिल्ह्यात गुरुवारी जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस पडला. यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले, तर कापणी करून शेतात ठेवलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


गुरुवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाची नोंद झाली. या काळात दुपारी १२ वाजेपर्यंत अंदाजे १ ते २ मिमी पाऊस पडला. तथापि, जिल्ह्यात कुठेही गारपिटीचे वृत्त नाही. मात्र वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. झालेल्या अवकाळी पावसामुळे मका, गहू आणि आंबा पिकांचे नुकसान झाले आहे, तर उन्हाळी भात पिकासाठी फायदेशीर ठरला आहे.


बुधवारी पहाटे अडीच वाजता जोरदार वादळ आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. यामुळे वातावरणात आर्द्रता आली आणि तापमानात घट झाल्यामुळे लोकांना कडक उन्हापासून दिलासा मिळाला. पावसामुळे काही भागात वीजपुरवठा खंडित झाला आणि लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. 


आज दिवसभरही भंडारा शहरात संध्याकाळसारखे वातावरण दिसून आले. सकाळी पाऊस पडत असल्याने लोक छत्री आणि रेनकोट घालून कामावर जाताना दिसले. शाळेतील मुले पावसात भिजत शाळेत पोहोचली. अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने लोकांना ये-जा करण्यात अडचणी येत होत्या.


शेतात ताडपत्रीने झाकले गहू पीक
गेल्या नोव्हेंबरपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडला नाही. गुरुवार, ३ एप्रिल रोजी हवामान बदलले आणि जिल्ह्यात सर्वत्र पाऊस पडला. यामुळे, शेतात कापून ठेवलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले. शेतात उघड्यावरील मालाचा बचाव करण्यासाठी ताडपत्रीने झाकण्याचा प्रयत्न करताना
शेतकऱ्यांची धावपळ दिसत होती.


वीज कोसळून पाथरी येथील दोघांचा मृत्यू
तुमसर तालुक्यातील पाथरी येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास वीज कोसळून शेतातील दोघांचा मृत्यू झाला. मृत शेतकऱ्यांमध्ये मनीषा भरत पुस्तोडे (२८), प्रमोद नागपूरे (४५, दोन्ही रा, पाथरी), असे आहे. यामुळे गावात शोककळा पसरली.


हवामान खात्याचा अंदाज ठरला खरा
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये तापमानात अभूतपूर्व वाढ आणि पूर्व रेषा कर्नाटक ते मध्य प्रदेशपर्यंत चक्राकार वाऱ्यांमुळे हवामानात बदल नोंदवण्यात आला आहे, ज्यामुळे हा अवकाळी पाऊस पडत आहे. पुढील २ दिवस हवामान असेच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.


आंबा, मका व विटभट्टी व्यावसायिकांचे नुकसान
वादळी पावसाने उंच वाढलेले मका पीक जमिनीवर लोळले. कच्च्या कैरी झडल्याने आंबा उत्पादकांचे नुकसान झाले. कच्च्या विटा भिजल्याने विटभट्टी व्यावसायिकांची हानी झाली.


सर्दी, खोकल्याचे आजार बळावणार
अवकाळी पावसामुळे वातावरणात मोठा बदल झाला आहे. दूषीत पाण्यामुळे सर्दी, खोकला व तापाचे व्हायरल आजार बळावण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.


जयंती कार्यक्रम व लग्न सोहळे विस्कळीत
४ एप्रिल रोजी परमपूज्य बाबा जुमदेवजी यांच्या जयंतीनिमित्त गावागावात विविध कार्यक्रमांचे तसेच लग्न सोहळ्यांचे आयोजन होते. परंतु, पावसामुळे सोहळे विस्कळीत झाले.

Web Title: Two killed in lightning strike due to unseasonal rains, wheat crop damaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.