आयुष्य खडतर; आंघोळ अन् जेवण ढाब्यावर, कुटुंबाची भेट कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 13:14 IST2024-05-21T13:13:54+5:302024-05-21T13:14:53+5:30
ट्रक चालकांची व्यथा : २४ तास स्टिअरिंगवर; स्वतःची कशी घेतात काळजी ?

Truck Driver's Life is hard; Bath and meal at the dhaba, when to visit family?
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ट्रक चालकांचे आयुष्य दगदगीचे असते. ट्रक चालक २४ तास स्टिअरिंगवर असतात. अशावेळी त्यांना जिवाची भीती वाटत नाही का, ते आरोग्याची काळजी कशी घेतात, असे अनेक प्रश्न ट्रक चालकांच्या आयुष्याकडे बघून मनात येतात.
त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटते, याबाबत संवाद साधला असता ते म्हणतात, आयुष्य कितीही खडतर असले तरी कुटुंबाच्या आनंदासाठी वेळ काढावा लागतो. ट्रकच्या धावत्या चाकांवर चालक आणि क्लीनरचे जीवन असते. कुटुंबापासून शेकडो किमी अंतरावर दूर जाऊन विशिष्ट दिवसांनी घरी परततात. त्यांची परतण्याची दगदग क्लेषकारकच असते. कुटुंबीयांपासून दूर देशभर त्यांचा प्रवास सुरू असतो. रात्रभर ट्रक चालवायचा, सकाळी ढाब्यावर थांबून अंघोळ आणि जेवण करायचे, थोडा आराम केला की पुढच्या प्रवासाला ते निघत असतात.
महिन्यातील काही दिवस बाहेर
ट्रक चालविण्याच्या कामातून ट्रक चालक कुटुंबीयांच्या गरजा भागतात. मुलांचे आरोग्य, शिक्षणासाठी पैशाची तरतूद होते. महिन्यातील बरेच दिवस घराबाहेर गेल्याशिवाय पर्याय नसतो.
कुटुंब कायम चिंतेत
ट्रक चालकांचे आयुष्य रस्त्यावरचे असते; पण आता स्मार्ट फोनचा जमाना असल्याने कुटुंबाशी संपर्क ठेवणे सोपे झाले; पण कधी काय होईल, हे कुणालाही सांगता येत नाही. त्यामुळे कुटुंबाच्या मनात कायम चिंता असते.
ना झोपेची वेळ, ना खाण्या-पिण्याची
ट्रक चालकांना ठरलेल्या ठिकाणी जायचे असते, त्यामुळे ना झोपेची वेळ निश्चित असते, ना खाण्या- पिण्याची; परंतु प्रकृती चांगली राहावी म्हणून स्वतःच शिजवून खातात. उन्ह, वारा, पाऊस यांचा मारा अनेकदा सहन करावा लागतो.
आरोग्याचे अनेक प्रश्न
कितीही काळजी घेतली तरी पुरेशी झोप आणि जेवणाच्या वेळा बदलतात. याचा प्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. त्यातून आरोग्याचे प्रश्न तयार होतात.
ट्रक डायव्हरचे जिणे हे असेच...
राज्याराज्यातील बदलती बोलीभाषा, लोकांचे चांगले-वाईट अनुभव दरवेळी येतात. कधी वाहतूक ठप्प झाली तर एकाच ठिकाणी थांबावे लागते. रात्री रस्ता चुकले तर मार्ग विचारत फिरावे लागते. महिन्याकाठी मिळणाऱ्या १५ ते २० हजार रुपयांमध्ये स्वतःचा आणि कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो. आजच्या महागाईच्या काळात एवढे पैसे पुरत नाहीत. सरकारने ट्रक चालकांसाठी काहीतरी योजना दिल्या पाहिजेत, यामुळे प्रपंच चालविणे सोपे होईल.
- अजमल शेख, ट्रक चालक.
कामात समाधानी राहावे लागते
बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून अन्न शिजवून खातो आणि आम्ही केबिनमध्येच झोप घेतो. रात्रभर ट्रक चालवायचा, सकाळी ढाब्यावर थांबून आंघोळ आणि जेवण करायचे. थोडा आराम केला की पुढच्या प्रवासाला निघायचे. ट्रक चालकाचे आयुष्य असेच असते. त्यामुळे कुणाच्या आयुष्यासोबत तुलना करण्यात अर्थ नाही. मिळेल त्या वेतनामध्ये काम सुरू असते. आयुष्य बदलण्याचा अनेकदा विचार येतो; परंतु अडचणींमुळे शक्य होत नाही. कामात समाधानी राहावे लागते.
- मोहन रहांगडाले, ट्रक चालक.
कामासाठी, कुटुंबासाठी पतीला बाहेर जावेच लागते. आता सवय झाली आहे, त्यांनाही समजून घेतले पाहिजे. कुटुंबाला हातभार लागावा म्हणून आम्ही मिळेल तो व्यवसाय करतो. महागाई खूप वाढली आहे.
- सुनंदा रहांगडाले, ट्रक चालक पत्नी.
कुटुंबासाठी त्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. पैसा मिळतो; पण त्यांचा वेळ मिळत नाही. मात्र, घर चालविण्यासाठी पैसा कमवावा लागतो. त्यांच्या आयुष्याची आता आम्हा कुटुंबीयांना सवय झाली.
- पल्लवी धांडे, ट्रक चालक पत्नी.