डीआरडीओमध्ये नोकरीच्या नावाखाली केली तीन तरुणींची फसवणूक; १.७४ लाखांना गंडविले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 19:10 IST2023-07-07T19:10:06+5:302023-07-07T19:10:27+5:30
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धंदर तपास करीत आहेत.

डीआरडीओमध्ये नोकरीच्या नावाखाली केली तीन तरुणींची फसवणूक; १.७४ लाखांना गंडविले
गोपालकृष्ण मांडवकर
भंडारा : केंद्रीय संरक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या रक्षा अनुसंधान आणि विकास संघटनेमध्ये नोकरी लावून देण्याचे खोटे आश्वासन देऊन नर्सिंग कॉलेजच्या तीन मुलींची १ लाख ७४ हजार रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. नरेंद्र चांदेवार, नितीन चांदेवार, संदीप वलथरे आणि संदीप चांदेवार (सर्व रा. साकोली, जिल्हा भंडारा) अशी आरोपींची नावे आहेत.
भंडारा येथील एरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगच्या अंतिम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनी अंजली मेश्राम, करिना पारधी आणि ज्योती कोराहे या विद्यार्थिनींशी रिद्धी पाटील नावाच्या बोगस फेसबुक आयडीवरून संपर्क करण्यात आला. डीआरडीओमध्ये नोकरी लावून देण्याचे आश्वासन देऊन त्यांची ऑनलाइन परीक्षाही घेण्यात आली. निकाल कळविल्यावर आणि रक्कम त्यांच्या खात्यावर पाठविल्यानंतर या विद्यार्थिनींनी नोकरीच्या नियुक्तिपत्रासाठी त्यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ते सतत टाळाटाळ करत राहिले. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी तुमसर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०, ४६८, ४७१ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक धंदर तपास करीत आहेत.
...अशीही बनवेगिरी
या विद्यार्थिनींची ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी आरोपींनी बनावट ई-मेल आयडीवरून त्यांना परीक्षेची नोटीस, प्रश्नपत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिकाही पाठवली. एवढेच नाही तर, त्यांची परीक्षा घेतली आणि डीआरडीओमध्ये निवड झाल्याचे सांगून आपल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अकाउंटमध्ये गुगल पेच्या माध्यमातून १ लाख ७४ हजार ४८० रुपये ट्रान्सफर करविले.